पुणे : महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर आणि स्वरतीर्थ सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार असलेल्या ‘गीतरामायण’चे स्वामित्व हक्क (काॅपी राईट) अजूनही माडगूळकर आणि फडके कुटुंबीयांकडे आहेत. त्यामुळे ‘गीतरामायण’ कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या संस्था आणि कलाकारांनी त्यांच्या कार्यक्रमाच्या जाहिरातीमध्ये, तसेच कार्यक्रम सादर होत असलेल्या व्यासपीठावरील फलकावर ग. दि. माडगूळकर विरचित ‘गीतरामायण’ असा उल्लेख ठळकपणाने करायला हवा, अशी अपेक्षा गदिमा कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
गीतरामायण हे महाकवी ग. दि.माडगूळकर यांनी रचलेले दीर्घ काव्य आहे. भारतात व परदेशात मराठी गीतरामायणाचे कार्यक्रम होत असतात. गीतरामायणाचे रूपांतरित हिंदी, गुजराती, कन्नड, तमिळ अशा विविध भाषेत कार्यक्रम होत असतात. मात्र, हलगर्जीपणामुळे गदिमा-बाबूजी नावाचा उल्लेख न करण्याचा वाईट पायंडा काही लोक पाडत आहेत. कार्यक्रमाच्या जाहिरातीत, प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या फलकावर लेखक म्हणून गदिमांचा उल्लेख केला जात नाही. हे माडगूळकर कुटुंबीयांतर्फे खपवून घेतले जाणार नाही. गीतरामायण सादर होणाऱ्या प्रत्येक जाहिरात फलकावर तसेच कार्यक्रमाच्या फलकावरही ‘महाकवी ग.दि.माडगूळकर विरचित गीतरामायण’ असा उल्लेख असायलाच हवा. तसेच, संगीत सुधीर फडके असा उल्लेख असणे आवश्यक आहे, अशी मागणी गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी केली आहे.
हेही वाचा… पिंपरी: हिंजवडीत सराईत गुन्हेगार निलेश गायवळचे फलक; गुन्हा दाखल
गीतरामायणाचे स्वामित्व हक्क अजूनही माडगूळकर आणि फडके कुटुंबीयांकडेच असून ते २०६२ पर्यंत अबाधित राहणार आहेत. गदिमांना त्यांचे श्रेय योग्य रीतीने न दिल्यास माडगूळकर कुटुंबीयांतर्फे संबंधित कार्यक्रमावर स्वामित्व हक्क कायद्यामार्फत आक्षेप घेतला जाईल याची कृपया नोंद घ्यावी, याकडे सुमित्र माडगूळकर यांनी लक्ष वेधले आहे.
हेही वाचा… पुणे: एक दशकापासून कागदावरच राहिलेल्या रस्त्यासाठी स्थानिक रहिवाशांची मुंबई उच्च न्यायालयात धाव !
‘गीतरामायण’ कार्यक्रम करण्यावर आमचा कुठलाही आक्षेप नाही. गदिमांचे गीतरामायण नव्या पिढीचे कलाकार पुढच्या पिढीपर्यंत नेत आहेत याचा आम्हाला आनंदच आहे, मात्र, गदिमांच्या नावाचा उल्लेख जाहिरातीत आणि कार्यक्रमात नसल्यास हे खपवून घेतले जाणार नाही. गदिमा व सुधीर फडके यांना त्याचे श्रेय मिळालेच पाहिजे. – सुमित्र माडगूळकर, गदिमांचे नातू