पुणे : शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला असून चोरट्यांनी विश्रांतवाडी पोलीस वसाहतीत घरफोडी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वसाहतीतील दोन सदनिकांमधून चोरट्यांनी एक लाख २६ हजार रुपयांचा ऐवज लांबविला.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे निम्मे जलतरण तलाव बंदच!

हेही वाचा – ‘आप’चे पिंपरी-चिंचवडचे कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांचे निलंबन रद्द

पोलीस शिपाई अल्लाउद्दीन मुसा सय्यद (वय २७, रा. विश्रांतवाडी पोलीस वसाहत, आळंदी रस्ता) यांनी या संदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सय्यद विश्रांतवाडी पोलीस वसाहतीतील इमारत क्रमांक एकमध्ये सदनिका क्रमांक दोनमध्ये राहायला आहेत. त्यांच्या शेजारील सदनिकेत पोलीस कर्मचारी पवन पवार राहायला आहेत. सय्यद पुणे पोलिसांच्या शीघ्र कृती दलात (क्विक रिस्पाॅन्स टीम) नियुक्तीस आहेत. सय्यद सदनिका बंद करून कामाला गेले होते, त्यांचे शेजारी पवन पवार कुटुंबीयांसह नातेवाईकांच्या विवाहासाठी बाहेर गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलुप तोडले. सय्यद यांच्या सदनिकेतील कपाट उचकटून ३३ हजार रुपये लांबविले. पवार यांच्या सदनिकेचे कुलुप तोडून चोरट्यांनी ९३ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलीस उपनिरीक्षक अंकुश डाेंबाळे तपास करत आहेत.