पुणे : बीडला निघालेल्या प्रवासी बसवर दरोडा घालून चोरट्यांनी बसचालकासह वाहक, प्रवाशांना मारहाण करून लुटल्याची घटना नगर रस्त्यावरील बकोरी फाटा परिसरात मध्यरात्री घडली. चोरटे मोटारीतून अहिल्यानगरकडे पसार झाले.
याबाबत बसचालक भाऊसाहेब युवराज मिसाळ (वय २६, रा. मयूर नायगाव, ता. पाटोदा, जि. बीड) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी वाहतूक करणारी बस भोसरीहून गुरुवारी रात्री बीडकडे निघाली होती. बस युवराज ट्रॅव्हल्सच्या मालकीची आहे. पुणे-नगर रस्त्यावरील बकोरी फाटा परिसरातील समृद्धी लाॅजजवळ प्रवाशांना घेण्यासाठी बस रात्री पावणेबाराच्या सुमारास थांबली. त्या वेळी चार चोरटे प्रवासी म्हणून बसमध्ये शिरले. चोरट्यांनी प्रवासी हृषीकेश सानप (वय २४, रा. बीड) यांना मारहाण करून पैशांची मागणी केली. त्यानंतर चोरट्यांनी बसचालक मिसाळ यांना धमकावले. चोरट्यांनी त्यांच्या खिशातील साडेपाच हजारांची रोकड काढून घेतली.
बसवाहक संतोष ठोकळ (वय ३३, रा. बीड) यांनाही चोरट्यांनी मारहाण करून त्यांच्या खिशातील दोन हजार रुपयांची रोकड लुटली. त्यानंतर चोरटे बसमधून खाली उतरले. पाठीमागून आलेली मोटार तेथे थांबली. चोरटे मोटारीतून अहिल्यानगरकडे पसार झाले. मध्यरात्री पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. त्या वेळी बकोरी फाटा परिसरात गर्दी होती.
प्रवासी वाहतूक करणारा बसचालक आणि वाहकाने दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी दिली.