राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसबा भागातर्फे शस्त्रपूजन

देशामध्ये तब्बल ६५ वर्षांनंतर मोठया प्रमाणात वैचारिक परिवर्तन झाले आहे. स्वातंत्र्यापासून सातत्याने सांगितलेल्या विचारांचा पगडा समाजमनाने दूर केला. हे परिवर्तन टिकवून ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काम करायला हवे. राष्ट्राला सर्वोच्च ठिकाणी नेण्यासाठी सर्वागीण विकासाच्या दृष्टीने वाटचाल करायला हवी. तात्पुरता विजय पुरेसा नाही, तर चिरस्थायी विजय मिळवायला हवा, असे मत भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी रविवारी व्यक्त केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसबा भागातर्फे विजयादशमीनिमित्त रमणबाग प्रशालेत झालेल्या शस्त्रपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. रांका ज्वेलर्सचे फत्तेचंद रांका, संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, कसबा भाग संघचालक किशोर शशीतल, सहसंघचालक सुहास पवार या वेळी उपस्थित होते. घोष, योगासने आणि अन्य प्रात्यक्षिके या प्रसंगी सादर करण्यात आली.

भंडारी म्हणाले,की भारताने दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून यशस्वी कारवाई केली. कोणतेही युद्ध न करता केवळ शस्त्रांच्या प्रदर्शनानेदेखील शत्रू राष्ट्राच्या मनात भीती निर्माण होऊ शकते, हे सिद्ध झाले. युद्धाची परिस्थिती आल्यास भारत काय करु शकतो, याचा विचार त्यांनी करायला हवा. भारताने केलेल्या ‘सर्जकिल स्ट्राईक’नंतर देशवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

परंतु ज्या काही लोकांनी यासंबंधी पुरावे मागितले ते सरकारवर नाही, तर भारतीय सनिकांच्या पराक्रमावर संशय घेत आहेत. मुस्लीम आणि अन्य धर्मीय लोक पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा झाला पाहिजे असे म्हणतात, त्यामुळे मूठभर लोकांचा विचार करायला नको.

रांका म्हणाले,की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रत्येक सदस्य देशासाठी आहे. संघाच्या अनेक सदस्यांनी राष्ट्रासाठी प्राणार्पण केले आहे. हिंदू संस्कृती टिकवली तरच धर्म जागृती होईल. केवळ धर्मातर रोखून उपयोग नाही. संस्कृतीचे जतन करण्यासाठी कुटुंबातूनच संस्कार व्हायला हवेत.

किशोर शशीतल यांनी प्रास्ताविक केले. सुहास पवार यांनी आभार मानले. चिंतामणी थत्ते यांनी सूत्रसंचालन केले.