लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत सोडतीद्वारे १ लाख १ हजार ९१६ विद्यार्थ्यांना प्रवेश करण्यात आला आहे. प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १४ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत प्रवेश निश्चित करता येणार आहे.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी ही माहिती दिली. आरटीईअंतर्गत दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानित) आणि महानगरपालिकेच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळांतील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात येतो. यंदा राज्यातील ८ हजार ८५३ शाळांमध्ये १ लाख ९ हजार ८७ जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यासाठी ३ लाख ५ हजार १५२ अर्ज दाखल झाले. त्यामुळे प्रवेशासाठी १० फेब्रुवारी रोजी ऑनलाइन सोडत काढण्यात आली. त्यात १ लाख १ हजार ९१६ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे.

प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे कागदपत्र पडताळणीसाठी नियुक्त केलेल्या पडताळणी समितीकडून कागदपत्राची प्राथमिक तपासणी करण्यात येईल. योग्य कागदपत्रे असल्यास विद्यार्थ्यांच्या नावापुढे ऑनलाइन नोंद करण्यात येईल. तसेच पालकाकडील प्रवेशपत्राद्वारे तात्पुरत्या प्रवेशाची नोंद करून हमीपत्र भरून घेतले जाईल. काही पालक दिलेल्या तारखेस कागदपत्र पडताळणीस उपस्थित राहू न शकल्यास त्यांना पुन्हा दोन संधी दिल्या जातील. त्यामुळे प्रवेशासाठी पडताळणी समितीला संपर्क साधवा. पालकांनी केवळ लघुसंदेशावर अवलंबून न राहता आरटीई संकेतस्थळावरील सूचना पाहाव्यात. दिलेल्या मुदतीनंतर शाळेत जागा रिक्त असल्या तरी प्रवेश दिला जाणार नाही. खोटी किंवा चुकीची माहिती भरून प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही टप्प्यावर प्रवेश रद्द करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गैरप्रकार निदर्शनास आल्यास तक्रार नोंदवण्याचे आवाहन

आरटीई प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने नियमानुसार राबवली जात आहे. पालकांनी प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये. गैरप्रकार निदर्शनास आल्यास depmah2@gmail.com, educommoffice@gmail.com या ईमेलवर अथवा प्रत्यक्ष पुराव्यासह तक्रार नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.