पुणे : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील बारामती विधानसभा मतदारसंघ चर्चेत राहिला. या मतदारसंघातून मागील ३० वर्षांपासून अजित पवार हे प्रतिनिधित्व करीत आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर या मतदारसंघातून अजित पवार यांच्या विरोधात कोण असणार अशी चर्चा कित्येक महिन्यांपासून सुरू असताना, शरद पवार यांनी युगेद्र पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. यामुळे या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवार गटाकडून आणि अजित पवार गटाकडून आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले. या आरोप प्रत्यारोपानंतर आज मतदानाचा दिवस उजाडला असून राज्यभरात ११ वाजेपर्यंत १८.१४ टक्के इतके मतदान झाले. तर दुसर्‍या बाजूला बारामती येथे १८.८१ टक्के इतके मतदान झाले आहे. तर यंदा नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहण्यास मिळत आहे. पण राज्यातील जनतेचे बारामतीच्या लढतीकडे लक्ष लागून राहिले आहे. काका की पुतण्या जिंकणार, याबाबत अनेक अंदाज वर्तविले जात आहे.

त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी सत्ताधारी पक्षाचा अपप्रचार करून काही प्रमाणात जागा जिंकल्या. पण आता राज्यातील जनतेला विरोधकांबाबत सर्व गोष्टी कळल्या आहेत. यामुळे राज्यातील जनता विरोधकांना मतदान करणार नाही. कारण मागील वीस दिवसांत राज्यभरात दौरे झाले. त्या दरम्यान महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. राज्यात महायुतीचं सरकार आल्यावर सर्व सामान्य नागरिक ते शेतकऱ्यांच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने महिला भगिनींकरिता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. यामुळे राज्यातील महिला भगिनीमध्ये आनंदाचे वातावरण असून राज्यातील महिला महायुतीच्या पाठीशी निश्चित राहतील आणि आमची सत्ता येणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – पिंपरीत सकाळच्या टप्यात मतदानाला अल्प प्रतिसाद; वाचा पहिल्या चार तासात किती मतदान?

हेही वाचा – पुणे : समाज माध्यमात बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदा पहिल्यांदाच बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होत आहे. यामुळे अजित पवार हे लाखांचं मताधिक्य कायम राखणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, मागील ३० वर्षांपासून अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघासह पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केल आहे. राज्यभरात विकास कामे केली आहेत. अजित पवार यांच्या कामाची पद्धत राज्यातील जनतेला माहितीच आहे. पण बारामतीच्या जनतेला देखील माहिती आहे. यामुळे अजित पवार यांच्या समोर कोणताही उमेदवार असला तरी अजितदादा लाखांच्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.