पुणे : वयाची शंभरी पूर्ण केलेले ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या नावाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्यंगचित्र अध्यासन केंद्र सुरू करण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी रविवारी केली. या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून जगभरातील व्यंगचित्रकारांनी पुण्यात यावे, या कलेचा अभ्यास करावा, अभ्यास-संशोधन करावे, चर्चा करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पुणे दौऱ्यावर आलेले ॲड. शेलार यांनी फडणीस यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दुर्मीळ पत्रांचे पुस्तक फडणीस यांना शासनाच्या वतीने भेट देण्यात आले. तसेच, त्यांच्या व्यंगचित्राची शैली, प्रदीर्घ अनुभव याबाबत शेलार यांनी त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी बरोबर असलेले भाजपचे पदाधिकारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये व्यंगचित्र अध्यासन केंद्र स्थापन करून त्याला शि. द. फडणीस यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली. त्यावर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी तातडीने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून याबाबत चर्चा केली. मंत्री पाटील यांनी याला तातडीने मान्यता दिली.
ॲड. शेलार म्हणाले, ‘ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांची शैली अनोखी आहे. त्यांनी नुकतीच वयाची शंभरी पूर्ण केली. आजही ते उमेदीने कार्यरत आहेत. महाराष्ट्राला आणि देशाला व्यंगचित्र, व्यंगचित्रकारांची मोठी पार्श्वभूमी आहे. त्यात शि. द. फडणीस यांनी स्वत:चा ठसा उमटवला आहे. ही कला जोपासली पाहिजे, संवर्धन केली पाहिजे, पुढे नेली पाहिजे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शि. द. फडणीस यांच्या नावाने अध्यासन केंद्र स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असून, दोन महिन्यांत हे अध्यासन घोषित केले जाईल.’
अध्यासन केंद्र करण्याची सुंदर कल्पना मांडली गेली आहे. त्यासाठी माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत. माझ्या कलेचे सार्थक झाले. व्यंगचित्रकलेचे भविष्य उज्ज्वल आहे. माझी चित्रे रंगीत, शब्दविरहित आहेत. त्यामुळे माझी चित्रे भाषेच्या सीमा ओलांडू शकली. – शि. द. फडणीस, ज्येष्ठ व्यंगचित्रकार