आरोग्याच्या दृष्टीने शहरातील हवेचा दर्जा काय याची माहिती मोबाईल अॅपद्वारे कळू शकणार आहे. ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मीटीओरॉलॉजी’तर्फे (आयआयटीएम) ‘सफर एअर’ हे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले असून या अॅपमध्ये हवेच्या दर्जाबरोबरच कोणत्या दर्जाची हवा असताना कशी आरोग्याची काळजी घ्यावी हेही कळणार आहे.
भूमी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. शैलेश नायक यांनी मंगळवारी पुण्यात आयआयटीएममध्ये या अॅपचे उद्घाटन केले. ‘सफर’चे (सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी- व्हेदर फोरकास्टिंग अँड रीसर्च) प्रकल्प संचालक डॉ. गुफरान बेग या वेळी उपस्थित होते.
वातावरणाविषयी माहिती पुरवणारी ‘सफर’ ही यंत्रणा सध्या दिल्ली आणि पुण्यात सुरू असल्यामुळे हे अॅप देखील सध्या या दोन शहरांत वापरता येणार आहे. एप्रिलपर्यंत ही यंत्रणा मुंबईमध्येही सुरू होणार असून त्यानंतर २०१७ पर्यंत अहमदाबाद, चेन्नई आणि कोलकात्यातही सफरची सेवा मिळण्यास सुरूवात होईल.
‘अॅप’ असे काम करणार
पुण्यातील ‘सफर’ यंत्रणेत शहरात वेगवेगळ्या १० ठिकाणी बसवलेल्या यंत्रणांद्वारे हवेच्या दर्जाची नोंद घेतली जाते. परंतु ‘सफर एअर’ अॅपमध्ये पुणे शहर, पिंपरी- चिंचवड शहर, पुण्याच्या बाहेरच्या बाजूंचा भाग (सबर्ब) आणि पिंपरी- चिंचवड सबर्ब अशा प्रमुख ठिकाणांच्या हवेचा दर्जा कळणार आहे. ज्या भागातून हवेचा दर्जा मागण्यात आला असेल त्याच्या जवळच्या दोन- तीन ठिकाणच्या सफर नोंदणी यंत्रणांच्या आकडय़ांवरुन तिथल्या हवेचा प्रातिनिधिक दर्जा काय हे सांगितले जाईल.
हवेच्या दर्जानुसार आरोग्यविषयक सूचना
या अॅपमध्ये हवेचा दर्जा ‘चांगला’, ‘ठीक’, ‘वाईट’, ‘अतिवाईट’ आणि ‘गंभीररीत्या वाईट’ अशा प्रतवारीत कळू शकणार आहे. यातील प्रत्येक दर्जाला वेगळा ‘कलर कोड’ देण्यात आला असून दर्जानुसार आरोग्यासाठी सल्लाही देण्यात आला आहे. हवेचा दर्जा ‘ठीक’ असेल तर अॅलर्जीचा त्रास असलेल्या नागरिकांनी फार काळ घराबाहेर राहणे व दीर्घकाळ अंगमेहनतीचे काम टाळावे किंवा हवेचा दर्जा ‘वाईट’ असेल तर हृदयविकार आणि फुफ्फुसांचे विकार असणारी मंडळी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना दीर्घकाळ घराबाहेर राहू देऊ नये, असे सल्ले ही यंत्रणा देईल. हवेच्या दर्जाबरोबर सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांचे प्रमाण काय हेही या अॅपमध्ये कळेल. या दर्जानुसारही काय काळजी घ्यावी हे अॅप सांगेल.
हे अॅप ँ३३स्र्://२ंऋं१.३१स्र्ेी३.१ी२.्रल्ल, ँ३३स्र्२://स्र्’ं८.ॠॠ’ी.ूे/२३१ी/ंस्र्स्र्२ किंवा ँ३३स्र्://६६६.ेी२.ॠ५.्रल्ल
या संकेतस्थळांवर डाऊनलोड करता येणार आहे.