पुणे : कालच विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपले. त्यामुळे राज्यातील कोणी मंत्री कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आले नसावेत. मात्र, केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या वतीने मी स्वत: स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलो आहे, अशी सारवासारव केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी केली.
हेही वाचा >>> पुणे : आजचा दिवस राजकीय बोलण्याचा नाही, प्रकाश आंबेडकर यांची टिप्पणी
कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभ अभिवादन कार्यक्रमाला राज्यातील सत्ताधाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. मात्र, दरवर्षी प्रमाणे यंदा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्तंभाला अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन शुक्रवारीच संपल्याने राज्यातील मंत्री कदाचित अभिवादन कार्यक्रमाला आले नसावेत. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारमधील सत्ताधाऱ्यांच्या वतीने मी स्वत: अभिवादनासाठी आलो आहे.
स्तंभ परिसराचा विकास होण्याबाबत आठवले म्हणाले, की कोरेगाव भीमा स्तंभ परिसराचा विकास होणे आवश्यक असून त्याकरिता १०० एकर जमीन मिळणे गरजेचे आहे. या ठिकाणी मोठे स्मारक उभे राहण्यासाठी मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करेन. दलित समाजाला न्याय मिळाला पाहिजे, देश अखंड राहीला पाहिजे. स्तंभ परिसरातील जागा सरकारने ताब्यात घेण्याचे ठरविल्यानंतर या ठिकाणची अतिक्रमणे पाडली पाहिजेत. तसेच या ठिकाणच्या नागरिकांना पर्यायी जागा देण्याची व्यवस्था केली पाहिजे. या ठिकाणची अतिक्रमणे आणखी वाढू नयेत म्हणून प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत. या स्तंभ परिसरातील विकासाचा आराखडा लवकरात लवकर पूर्ण केला पाहिजे. त्याला काही मदत लागत असल्यास केंद्र सरकार मदत करेल.