scorecardresearch

“राज्यपालांनी साधी दिलगिरी व्यक्त केली नाही, एवढी…”, संभाजीराजेंची कोश्यारींवर टीका; म्हणाले…

आंदोलकांना संबोधित करताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, छत्रपती शिवाजी ही आपली अस्मिता आहे. जे कोणी हे मानत नाही त्यांचा कडेलोट होतो.

“राज्यपालांनी साधी दिलगिरी व्यक्त केली नाही, एवढी…”, संभाजीराजेंची कोश्यारींवर टीका; म्हणाले…
संभाजीराजे छत्रपती संग्रहित छायाचित्र

पिंपरीः महाराष्ट्रातील राष्ट्रपुरूषांचा अपमान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचाही दोन वेळा अवमान केला असून त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली नाही. अशा राज्यपालाला महाराष्ट्रात राहण्याचा कोणताही अधिकार नाही, त्यांची तातडीने हकालपट्टी झाली पाहिजे, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी गुरूवारी पिंपरीत बोलताना केली. महाराजांविषयी सातत्याने होणाऱ्या अवमानकारक विधानांमागे नियोजनपूर्वक षडयंत्र असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवड बंद आंदोलनादरम्यान विविध संस्था, संघटनांच्या वतीने आयोजित पिंपरी चौकातील निषेध सभेत ते बोलत होते.

आंदोलकांना संबोधित करताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे. जे कोणी हे मानत नाही त्यांचा कडेलोट होतो. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती महाराजांबाबत दोनवेळा वादग्रस्ते विधाने केली आहेत. तरी देखील त्यांनी साधी दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली नाही. कसली एवढी मग्रुरी आहे हे कळत नाही. आता यांनी दिलगिरी व्यक्त केली तरी आता आम्ही ती मान्य करणार नाही.

हेही वाचा: १३ डिसेंबरला पुणे बंद; राज्यपालांनी शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ विविध संघटनांचा निर्णय

तसेच आम्हाला हा राज्यपाल नको , त्याला महाराष्ट्रातून बाहेर (हाकलून द्या) पाठवून द्या. हे जर घडले नाही तर महाराष्ट्र बंद शिवाय पर्याय नाही. राज्यपालानंतर तीन व्यक्तींनी छत्रपतींचा अवमान केला . किती दिवस हे सहन करायचे कधीतरी पक्षाच्या पुढे पाहिले पाहिजे. महाराष्ट्र बंदचा माझ्यावर दवाब होता पण लोकांना वेठीस धरायला नको म्हणून मी याबद्दल घोषणा केली नाही. आजच्या बंद मध्ये दोन पक्षांचे लोक सहभागी झाले नाहीत मी जर त्या पक्षांशी निगडित असतो तर पक्षाचा दवाब झुगारून बंद मध्ये सहभागी होण्यासाठी आलो असतो असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 14:34 IST

संबंधित बातम्या