पिंपरी : पुणे, पिंपरी-चिंचवड शहराला जोडणाऱ्या मुळा नदीवरील सांगवी-बोपोडी पुलावर कमान आणि सुशोभीकरण करण्यात येत असल्याने तो पुढील तीन महिने वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या काळात पर्यायी मार्ग वापरावा, असे आवाहन महापालिकेच्या स्थापत्य विभागाने केले आहे.

सांगवी आणि बोपोडीला जोडणाऱ्या पुलावर सध्या महापालिकेकडून कमान बसविण्याचे काम सुरू आहे. अवजड लोखंडी खांबांची जोडणी करून ही कमान बसविण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीसाठी, पादचाऱ्यांसाठीही पूल पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. या कामासाठी तीन महिने लागणार आहेत. संबंधितांची गैरसोय होऊ नये म्हणून दिशादर्शक फलक आणि पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत ठेवण्याचे नियोजन झाले आहे.

‘काम पूर्ण झाल्यावर या पुलामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांच्या सौंदर्यात भर पडणार आहे. काम गतीने आणि वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. तोपर्यंत पर्यायी मार्गांचा अवलंब करावा,’ असे आवाहन मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी केले आहे.