पिंपरी : मुंबईवर शिवसेना (ठाकरे) पक्षाची पकड असल्याने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची मागणी आहे. मुंबई वगळता अन्य महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढविणार असल्याचे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडण्यात आली. त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष फोडला जाईल, असे भाकीतही त्यांनी वर्तविले. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार राऊत यांनी सोमवारी पिंपरी-चिंचवडमधील पक्ष संघटनेचा आढावा घेतला. तत्पूर्वी त्यांनी हिंजवडीत माध्यमांशी संवाद साधला.

खासदार राऊत म्हणाले, ‘मुंबईवर शिवसेना (ठाकरे) पक्षाची पकड आहे. ती ठेवण्यासाठी स्वबळावर लढावे, अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी तुटली किंवा संपली, असा अर्थ निघू शकत नाही. केवळ मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविली जाईल. ही परिस्थिती संपूर्ण राज्यात नसणार आहे. मुंबईवगळता इतर ठिकाणी महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढविणार आहे.’

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढविल्यानंतरही त्यांना भाजपने मुख्यमंत्रीपद दिले नाही. शिंदे यांचे हायकमांड भाजप आहे. त्यांचा आदेश शिंदे यांना पाळावा लागतो. शिंदे यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. दाखल होणारे खटले थांबविण्यासाठीच शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले, अशी टीका खासदार राऊत यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडण्यात आली. त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष फोडला जाईल. देशभरातील पक्ष फोडण्याची भाजपला चटक लागली आहे. चंद्राबाबू नायडू, नितीशकुमार यांचेही पक्ष फोडले जातील,’ असे खासदार राऊत म्हणाले.