पुणे : डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठामध्ये गेल्या काही दशकांपासून काम करण्यात येत असलेला संस्कृत शब्दांचा जगातील सर्वांत मोठा विश्वकोश पहिल्यांदाच डिजिटल स्वरूपात आणण्यात आला आहे. केंद्र सरकारने देशाच्या प्राचीन भाषिक वारशाचे जतन, संवर्धन आणि प्रचार करण्यासाठी संस्कृत शब्दकोशावर आधारित ‘कोषश्री’ या संकेतस्थळाची निर्मिती केली असून, या माध्यमातून संस्कृतमधील ज्ञानाचा ठेवा आता सहजगत्या जगभरातील शैक्षणिक संशोधनासाठी उपलब्ध होणार आहे.
डेक्कन कॉलेजने प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त दिल्ली येथील कार्यक्रमात कोषश्री संकेतस्थळाचे लोकार्पण केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले. हा प्रकल्प डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डॅक) यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या विज्ञान आणि धरोहर संशोधन योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला.
भाषातज्ज्ञ प्रा. एस. एम. कात्रे यांच्या दृष्टीतून साकारल्या जाणाऱ्या जगामधील सर्वांत मोठ्या संस्कृत शब्दांच्या विश्वकोशाचे काम डेक्कन कॉलेजमध्ये गेली अनेक दशके अविरतपणे सुरू आहे. ऋग्वेदापासून १९ व्या शतकातील ग्रंथांपर्यंत जवळजवळ १५०० संस्कृत ग्रंथांमधून १ कोटी संदर्भांचे संकलन करून तयार केलेले स्क्रिप्टोरिअम विद्यापीठात जतन केले आहे.
वेद, वेदान्त, दर्शन, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, कृषिशास्त्र, शिल्पशास्त्र अशा तब्बल ६२ विद्याशाखांमधून अनेक शब्द, त्यांच्या संदर्भांचे संकलन करण्यात आले आहे. तसेच, त्यांची रचना, त्यांचे अर्थ यात ऐतिहासिक क्रमाने दिले आहेत. १९७६ पासून आतापर्यंत या शब्दकोशाचे ३५ खंड प्रकाशित झाले आहेत. डेक्कन कॉलेज आणि सी-डॅकच्या सहकार्याने १५ लाख शब्द आणि १ कोटी संदर्भ प्रती डिजिटाइज केल्या आहेत.
विद्यमान शब्दकोश जतन करणे, त्याचे डिजिटायझेशन करणे आणि त्याचा विस्तार करून तो ऑनलाइन खुला करणे हा ‘कोषश्री’ प्रकल्पाचा उद्देश आहे. ‘कोषश्री’ संकेतस्थळ संस्कृत अभ्यासक, भाषाशास्त्रज्ञ, प्राच्यविद्या अभ्यासक, संशोधक, विद्यार्थ्यांसह सर्वांसाठी खुले आहे. संकेतस्थळावरील विदा विषय, लेखक, काळ, व्याकरण घटक याद्वारे प्राथमिक, प्रगत स्तरावर शोध शक्य असल्याची माहिती डेक्कन कॉलेजने दिली. कोषश्री संकेतस्थळ https://koshashri-dc.ac.in या दुव्याद्वारे पाहता येणार आहे.
भारतीय ज्ञान प्रणाली केंद्राची स्थापना
केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय आणि डेक्कन कॉलेज यांच्या सहकार्याने डेक्कन कॉलेजमध्ये भारतीय ज्ञानप्रणालीचे केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रातील २१ पैकी २० पदे शैक्षणिक, तर एक पद प्रशासकीय आहे. संस्कृत शब्दकोश प्रकल्पाला गती देणे, भारतीय ज्ञानप्रणाली क्षेत्रात योगदान, संस्कृत आणि कोशशास्त्र विज्ञानातील तरुण संशोधकांसाठी प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित करणे अशी या केंद्राची उद्दिष्टे असल्याचे डेक्कन कॉलेजकडून सांगण्यात आले.