बारामती : बारामतीतील काटेवाडी येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने धोतराच्या पायघड्या घालून, सनई-चौघड्यांच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात स्वागत केले. गेल्या १४० वर्षांपासून काटेवाडीत धोतराच्या पायघड्यांनी पालखी स्वागताची परंपरा जपली जात आहे. यंदाही रांगोळ्या, पताका आणि स्वागत कमानींनी परिसरातील वातावरण भक्तिमय झाले.

काटेवाडीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत धोतराच्या पायघड्यांनी करण्याची परंपरा वर्षानुवर्षे जपली जात आहे. संत गाडगे महाराजांच्या शिकवणुकीतून ही प्रथा सुरू झाल्याचे सांगितले जाते. गावाच्या वेशीजवळ पालखी खांद्यावर घेतल्यानंतर ग्रामस्थ पायघड्या घालतात. या वेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. वारकऱ्यांनी गावातील जेवणासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरीही जेवणाचा आस्वाद घेतला.

बारामतीत पालखी सोहळा दाखल झाल्यानंतर मेंढ्यांच्या गोल रिंगणाचे आकर्षण असते. काटेवाडीतील बस स्थानकाजवळ पालखीचे स्वागत झाल्यानंतर मुख्य मार्गावरून पालखी गावातील मैदानावर नेण्यात आली. या वेळी पालखीभोवती मेंढ्यांचे रिंगण घातले गेले. रिंगणानंतर पालखीने इंदापूर तालुक्यातील सणसर येथे प्रस्थान ठेवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालखी सणसर मुक्कामी

इंदापूर तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या भवानीनगरमधील छत्रपती सहकारी साखर कारखाना येथे इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी व क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, त्याचप्रमाणे इंदापूर तालुका प्रशासनाच्या वतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या. त्यानंतर पालखी सोहळ्याने सणसर मुक्कामी प्रस्थान ठेवले. या वेळी पालखी रथाचे सारथ्य दत्तात्रय भरणे यांनी केले.