पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची ३५४ पदे भरली जाणार आहेत. यासाठी भरती प्रक्रिया सुरू असून, २६ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यात कक्षसेवक पदाच्या १६५ जागांसाठी सर्वाधिक १४ हजार २४६ अर्ज आले आहेत. बटलर पदाच्या ४ जागांसाठी सर्वाधिक कमी म्हणजे केवळ ४३ अर्ज आले आहेत.
वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने ससूनमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची ३५४ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात कक्षसेवकांची सर्वाधिक १६८ पदे असून, आया ३८, सेवक ३६, पहारेकरी २३, शिपाई २, क्ष-किरण सेवक १५, हमाल १३, रुग्णपटवाहक १०, सहायक स्वयंपाकी ९, नाभिक ८, स्वयंपाकी सेवक ८, प्रयोगशाळा सेवक ८, बटलर ४, दवाखाना सेवक ४, माळी ३, प्रयोगशाळा परिचर १, भांडार सेवक १, गॅस प्रकल्प चालक १ अशी पदे आहेत. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १५ ऑगस्टपासून सुरू झाली होती. उमेदवारांना ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत होती. या भरतीतील प्रत्येक संवर्गासाठी सामाजिक आरक्षण लागू आहे. ससूनमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी वेतनश्रेणी १५ ते ४७ हजार ६०० रुपये आहे.
ससून रुग्णालयात अनेक वर्षांनी ही सरळसेवा भरती सुरू आहे. उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी एकूण २६ हजार १०१ जणांचे अर्ज आले आहेत. त्यातील सर्वाधिक १४ हजार २४६ अर्ज कक्षसेवक पदासाठी आले आहेत. त्या खालोखाल सेवक पदासाठी २ हजार ३४०, क्ष-किरण सेवक पदासाठी २ हजार १५५, पहारेकरी पदासाठी १ हजार ७४१, प्रयोगशाळा परिचर पदासाठी १ हजार ५०९ आणि आया पदासाठी १ हजार ४१ अर्ज आले आहेत.
त्यानंतर हमाल पदासाठी ७३४ अर्ज, संदेशवाहक ३५३, दवाखाना सेवक ३४७, शिपाई २५९, रुग्णपटवाहक २५८, माळी २२०, सहायक स्वयंपाकी १९०, नाभिक १४८, भांडार सेवक १४५, प्रयोगशाळा सेवक १३३, गॅस प्लांट ऑपरेटर १२८, स्वयंपाकी सेवक १११ आणि बटलर ४३ असे अर्ज आले आहेत.
जास्त अर्ज कोणत्या जिल्ह्यातून?
ससूनमधील भरतीसाठी सर्वाधिक ९ हजार ९५० अर्ज पुण्यातून आले आहेत. त्या खालोखाल छत्रपती संभाजीनगरमधून १ हजार ८९६, नांदेड १ हजार ६९४, अमरावती १ हजार २३६, लातूर १ हजार १७०, अहिल्यानगरमधून १ हजार ५१ अर्ज आले आहेत.
ससून रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची ३५४ पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. आयबीपीएस कंपनीकडून ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जात आहे. यासाठी २६ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. – गोरोबा आवटे, मुख्य प्रशासकीय अधिकारी, ससून सर्वोपचार रुग्णालय.