पुणे: गेल्या काही दिवसांत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी संघटना, राजकीय पक्ष यांच्यातील वादांच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने विद्यापीठाने पोलीस आयुक्‍त, कुलगुरूंच्या उपस्थितीत येत्या शनिवारी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्या संघटनासोबत चर्चा करून सर्वंकष उपाययोजना करण्यासाठी पाऊल उचलले जाणार आहे.

विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. विद्यापीठात काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, स्टुडंट् फेडरेशन ऑफ इंडिया या दोन संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. या प्रकरणी दोन्ही संघटनांकडून पोलिसांकडून तक्रारी दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर विद्यापीठाच्या वसितगृहातील भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त मजकूर लिहिल्याची तक्रार अभाविपने केली. त्यानंतर भाजपने निषेध मोर्चा काढल्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि अन्य एका संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली होती. त्यामुळे विद्यापीठात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पुणे पोलिसांनी ७ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत विद्यापीठात जमावबंदी लागू केली आहे.

हेही वाचा… पुण्यात पुन्हा कोयता गॅंग सक्रिय; टिळक रस्त्यावर तरुणावर वार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यापीठ आवारात शैक्षणिक पावित्र्य राखणे, वैचारिक स्वातंत्र्यासोबत सलोख्याचे वातावरण जपणे ही समाजाच्या सर्व घटकांची सामुूहिक जबाबदारी आहे. विद्यापीठाशी संबंधित सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्या संघटनांसोबत चर्चा करून सर्वंकष उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी शनिवारी सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील ज्ञानेश्वर सभागृहात विद्यार्थी प्रतिनिधींची कुलगुरू, पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक आयोजत करण्यात आली आहे. संघटनेच्या कमाल तीन ते पाच प्रतिनिधींना बैठकीस उपस्थित राहता येणार आहे.