scorecardresearch

स्वायत्त महाविद्यालयांना स्वायत्तता; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सुधारित मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध

विद्यापीठाने दोन वर्षांपूर्वी स्वायत्त महाविद्यालयांसाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानंतर आता सुधारित मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या.

Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (संग्रहित छायाचित्र)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सोमवारी स्वायत्त महाविद्यालयासाठी सुधारित नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार आता स्वायत्त महाविद्यालयांना नव्या अभ्यासक्रम सुरू करण्यास विद्यापीठाची परवानगी आवश्यक नसल्याचे, दोनपेक्षा अधिक अभ्यासक्रम सुरू करण्यास बंधन नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अभ्यासक्रमांचे शुल्क ठरवण्याचे अधिकार महाविद्यालयांनाच देण्यात आले असून, सध्याच्या परीक्षा शुल्कात दोन वर्षांतून एकदा दहा टक्के शुल्कवाढ करता येणार आहे.

हेही वाचा- आरटीई शाळा नोंदणीसाठी आता १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ; राज्यभरात अद्यापही बाराशेहून अधिक शाळांची नोंदणी बाकी

विद्यापीठाने दोन वर्षांपूर्वी स्वायत्त महाविद्यालयांसाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी विद्यापीठाची मान्यता, १५ टक्के परीक्षा शुल्क विद्यापीठाला देणे, एकावेळी दोनपेक्षा अधिक अभ्यासक्रम किंवा तुकड्या सुरू करू नयेत आदी बंधने स्वायत्त महाविद्यालयांवर घालण्यात आली होती. त्यामुळे स्वायत्त महाविद्यालयांनी या मार्गदर्शक सूचनांना विरोध केला होता. त्यामुळे विद्यापीठाकडून स्वायत्त महाविद्यालयांसदर्भात समिती नियुक्त करण्यात आली. त्यानंतर आता सुधारित मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या.

हेही वाचा- मानाच्या शिखरी काठ्यांची खंडोबा भेट; माघी पौर्णिमा यात्रेला प्रचंड गर्दी

विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, स्वायत्त महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांची समकक्षता विद्यापीठाकडून दिली जात होती. आता त्यासोबत स्वायत्त संस्थांसाठी “पीआरएन’ म्हणजेच परमनण्ट रजिस्ट्रेशन नंबरही दिला जाणार आहे. त्याचा उपयोग ॲकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिटच्या अंमलबजावणीसाठीही होणार आहे. या पूर्वीच्या नियमावलीत अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मर्यादा होत्या. आता स्वायत्त संस्थांना एकाच वेळी एका विद्याशाखेत दोन पेक्षा अधिक अभ्यासक्रम अथवा तुकड्या सुरू करण्यास मुभा आहे. मात्र त्यासाठी भौतिक सुविधा व आवश्‍यक मनुष्यबळाची पूर्तता करण्याची अट आहे. स्वायत्त महाविद्यालयांनी नवीन अभ्यासक्रम सुरू करताना, त्याचा मसुदा त्या त्या शैक्षणिक वर्षाच्या ३१ मार्चपर्यंत विद्यापीठाकडे पाठविणे आवश्‍यक आहे. अभ्यासक्रमासह प्रवेश क्षमता, प्रश्नपत्रिका, परीक्षेचे स्वरुप, गुणांकन, श्रेयांक आदी तपशीलही द्यायचा आहे. विद्यापीठाकडून संबंधित अभ्यासक्रमांना त्या शैक्षणिक वर्षाच्या ३१ मेपर्यंत प्रमाणित करण्यात येईल. त्यासाठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांना निमंत्रित करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा- हिंदू महासंघ संघटनेचे आनंद दवे कसबा पोटनिवडणूक लढणार, शैलेश टिळक यांची घेतली भेट

अभ्यासक्रमासाठीचे शुल्क स्वायत्त महाविद्यालयांना त्यांच्या स्तरावर ठरवण्याची मुभा आहे. तसेच शिष्यवृत्तीसाठीचे प्रस्ताव महाविद्यालयांनी शासनाकडे सादर करायचे आहेत. पीएच.डी. अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाच्या नियमांनुसार करणे आवश्यक आहे. तर स्वायत्त महाविद्यालयांनी परीक्षा शुल्कातून १० टक्के रक्कम विद्यापीठाला द्यायची आहे. दोन वर्षांतून एकदा दहा टक्के परीक्षा शुल्कात वाढ करता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यापीठाकडून स्वायत्त महाविद्यालयांच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. सुधारित मार्गदर्शक स्वागतार्ह आहेत. पूर्वीच्या मार्गदर्शक सूचनांतील आक्षेप आता दूर झाले आहेत. मात्र संलग्नता शुल्क आणि पीएच.डी. प्रवेशांसंदर्भात अधिक स्पष्टता, सुधारणेला वाव आहे, असे मत प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी व्यक्त केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 22:07 IST
ताज्या बातम्या