पुणे : कलेच्या क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या व्यक्तीस नटरंग ॲकॅडमीतर्फे दिल्या जाणाऱ्या कलागौरव, तसेच सामाजिक कृतज्ञता पुरस्कारासाठी योग्य व्यक्तिमत्त्वांची निवड करण्यात आली आहे, असे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे सांगितले.
नटरंग ॲकॅडमीतर्फे दिल्या जाणाऱ्या ३१ व्या स्व. शाहीर मधू कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठानच्या कलागौरव पुरस्काराने लोकप्रिय विनोदी अभिनेत्री नम्रता संभेराव, तर तिसऱ्या स्व. गिरीश बापट स्मृती नटरंग प्रतिष्ठान सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने राष्ट्रपतिपदक विजेते कलाशिक्षक सागर बगाडे यांना सन्मानित करण्यात आले. त्या वेळी पाटील बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हेमंत रासने होते. कार्यक्रमास नटरंग ॲकॅडमीच्या अध्यक्षा स्वरदा बापट, कार्याध्यक्ष जतीन पांडे, विश्वस्त ललित जैन, शाहीर परिषदेचे अध्यक्ष दादा पासलकर, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, जयमाला इनामदार, विजय कडू, राजेश येनपुरे या वेळी उपस्थित होते.
नम्रता संभेराव म्हणाल्या, ‘रसिक प्रेक्षकांशिवाय आम्हा कलाकारांचा प्रवास अपूर्ण आहे. कलागौरव पुरस्कराच्या माध्यमातून कलेच्या क्षेत्रात उत्साहाने प्रेरणा घेऊन नव्या जोमाने कार्य करण्यास तयार आहे.’ गिरीश बापट यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराचे मोल मोठे आहे. पुरस्काराचे पावित्र्य ठेवून सामाजिक कार्यातील वाटचाल कायम ठेवणार आहे, असे सागर बगाडे यांनी सांगितले.