पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी शनिवारवाडा (काकासाहेब गाडगीळ पुतळा) ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा असा चौपदरी भुयारी मार्ग प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात येत असून, हा अहवाल अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेण्याचे आश्वासनही केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी दिले.
गडकरी हे पुणे दौऱ्यावर आले असता, त्यांनी काकासाहेब गाडगीळ पुतळा, शनिवारवाडा मुख्य प्रवेशद्वार येथे भेट दिली. आमदार हेमंत रासने यांनी या प्रकल्पाची माहिती देऊन प्रकल्प उभारण्यासाठी निधी देण्याबाबतचे निवेदन दिले. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील या वेळी उपस्थित होते.
आमदार रासने म्हणाले, ‘शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता हे शहरातील मध्यवर्ती मार्ग आहेत. या परिसरात ऐतिहासिक वास्तू, धार्मिक स्थळे, शाळा-महाविद्यालय आणि मोठी बाजारपेठ असल्याने दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर सातत्याने वाहतूककोंडी होते. हे दोन्ही रस्ते दक्षिणोत्तर मार्गाचा महत्त्वाचा दुवा असून, भविष्यात ‘लिंक कॉरिडॉर’ म्हणून उपयोग होण्याची क्षमता असल्याने आणि ऐतिहासिक वारसा जपणूक म्हणून वाहतूक सुलभीकरणासाठी शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा असा ‘चौपदरी भुयारी मार्ग’ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.’
‘शहराच्या मध्यवर्ती मार्गांवरील वाहतूककोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून सुमारे २.५ किलोमीटर लांबीचा हा चार पदरी भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येत असून, हा अहवाल अंतिम टप्प्यात आला आहे. प्रकल्पाच्या निधीसाठी राज्याच्या अर्थ विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून निधी मिळावा, यासाठी गडकरी यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यांनी या प्रकल्पाला सकारात्मकता दर्शवली असून, लवकरच अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे,’ असे रासने यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जाज्वल्य इतिहासाचे प्रतीक असलेल्या शनिवारवाड्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या पातळीवर विशेष मदत मिळावी, अशी विनंतीही रासने यांनी या वेळी केली.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- शनिवारवाडा (काकासाहेब गाडगीळ पुतळा) ते स्वारगेट असा एक भुयारी मार्ग
- सारसबाग ते शनिवारवाडा हा दुसरा भुयारी मार्ग
- प्रत्येकी अडीच किलोमीटर अंतराचे मार्ग
- ३० फूट जमिनीखालून मार्ग जाणार
- प्रकल्पासाठी अंदाजे ५५० कोटी रुपयांचा निधी आवश्यक
- राज्य सरकारबरोबर केंद्राकडूनही निधी मिळण्याची शक्यता