पिंपरी : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही पक्षांनी एके काळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरावर पुन्हा लक्ष केंद्रित केले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज (मंगळवारी) स्वतंत्र मेळावे होणार असून, त्याद्वारे दोन्ही ‘राष्ट्रवादी’ शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
शरद पवार यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत. तसेच ताथवडे येथे मेळावा होणार आहे. अजित पवार यांच्या पक्षाचा मेळावा भोसरीत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातून अजित गव्हाणे २५ माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या पक्षाच्या मेळाव्याला शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री शशिकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत. सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत मेळावा होणार असल्याचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सांगितले. या मेळाव्यात शरद पवार, पक्षाच्या कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात सायंकाळी चार वाजता कार्यकर्ता मेळावा होणार आहे. या मेळाव्यात गव्हाणे आणि त्यांचे समर्थक पक्षप्रवेश करणार असल्याचे कार्याध्यक्ष फजल शेख यांनी सांगितले. या पक्षप्रवेश सोहळ्यात अजित पवार काय बोलतात, याकडेही लक्ष असणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहर एके काळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांनी अजित पवारांची साथ सोडून कमळ हातात घेतले आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. २०१७ मध्ये महापालिकेवर भाजपची सत्ता आली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता दोन्ही पक्षांनी शहराकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.