राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ब्राह्मण संघटनांमध्ये बैठक होणार असल्याच्या मुद्द्यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांवर निशाणा साधला होता. “पवारांना इतक्या वर्षांनी ब्राह्मणांची आठवण आली याचा आनंद आहे,” असं म्हणत फडणवीसांनी टीका केली होती. यावर शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. “मला अशी कुठलीही आठवण आलेली नाही,” असं मत पवारांनी व्यक्त केलं. ते शनिवारी (२१ मे) पुण्यात पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “मला अशी कुठलीही आठवण आलेली नाही. कुठल्याही समाजाचे काही प्रश्न असतील तर ते ऐकून घेतले पाहिजेत. देवेंद्र फडणवीस म्हणतात ब्राह्मण समाजाची आम्हाला आठवण झाली, पण त्यांचा आम्हाला राजकीय फायदा होईल की नाही हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही.”

“आनंद दवे नावाच्या व्यक्तीने माझ्याकडे भेटीसाठी वेळ मागितली”

“आनंद दवे नावाच्या व्यक्तीने माझ्याकडे भेटीसाठी वेळ मागितली. इतरही संघटनांना मला भेटायचं होतं. त्यानुसार मी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना भेट निश्चित करण्यास सांगितलं. एकूण १३ संघटनांचे ४० लोक या बैठकीला होते. त्यांनी काही मुद्दे माझ्यासमोर मांडले,” अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

“कुठल्याही जात, धर्म याविरोधात कोणीही वक्तव्य करू नये”

शरद पवार म्हणाले,” ब्राह्मण संघटनांमध्ये एक अस्वस्थता होती. ती अस्वस्थता माझ्या पक्षातील काही सहकाऱ्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत होती. हे विधानं केल्यानंतर पक्षात आमची चर्चा झाली. त्यात कुठल्याही जात, धर्म याविरोधात कोणीही वक्तव्य करू नये असं आम्ही सांगितलं. याबाबत आम्ही बैठकीत माहिती दिली.”

“ब्राह्मण समाजासाठी आरक्षणाचं सूत्र बसणार नाही”

“ब्राह्मण संघटनांची दुसरी मागणी होती की ग्रामीण भागातील हा वर्ग शहरी भागात येत आहे. त्यामुळे त्यांना नोकरीत अधिक संधी मिळण्याची स्थिती हवी आहे. आम्ही केंद्र आणि राज्याची माहिती गोळा केली होती. त्यात नोकऱ्यांमध्ये त्यांची लोकसंख्येनुसार संख्या अधिकच दिसली. त्यामुळे या ठिकाणी आरक्षणाचं सूत्र बसणार नाही असं मी सांगितलं,” अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

“काहींनी कुणालाच आरक्षण नको असं म्हटलं”

“काहींनी कुणालाच आरक्षण नको असं म्हटलं. मात्र, मी मागास घटकांना आरक्षण द्यावंच लागेल असं सांगितलं. तसेच आरक्षणाला विरोध करू नये, असंही मी सांगितलं. आपल्या राज्यात विविध समाजांना मदत करण्यासाठी महामंडळं आहेत. तसं ब्राह्मण समाजासाठी परशूराम महामंडळ काढावं अशी त्यांची मागणी होती. तो प्रश्न राज्य सरकारचा आहे असं मी सांगितलं. तसेच मुख्यमंत्र्यांचा वेळ घेऊन त्यांची आणि यांची भेट घडवून आणेल असंही आश्वासन दिलं,” असं पवारांनी नमूद केलं.

“”मी पक्षातील नेत्यांना समज दिली, त्यापेक्षा अधिक काही करू शकत नाही”

ब्राह्मण समाजाबाबत वक्तव्य करणाऱ्या पक्षातील नेत्यांवर कारवाई करण्याच्या मागणीवर बोलताना शरद पवार म्हणाले, “मी पक्षातील नेत्यांना समज दिली आहे. त्यापेक्षा अधिक मी काही करू शकणार नाही. राज्यात वातावरण खराब झालं असं मला वाटत नाही. मात्र, जबाबदार पक्षाच्या जबाबदार नेत्यांनी केलेल्या काही वक्तव्यांना काही वर्ग अस्वस्थ होऊ शकतो. अशावेळी जाणकारांनी चर्चा करून ती अस्वस्थता कमी केली पाहिजे.”

हेही वाचा : शरद पवारांकडून उद्या ब्राह्मण संघटनांची बैठक, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझ्याकडे पहिल्यांदाच ब्राह्मण समाजाच्या संघटनांकडून भेटीची मागणी करण्यात आली. त्यामुळे त्यांचं म्हणणं काय आहे हे समजून घेण्यासाठी मी ही बैठक घेतली,” असंही पवारांनी नमूद केलं.