जेजुरी : पुरंदरमधील नियोजित विमानतळासाठी जमीन मोजणीला शेतकऱ्यांनी परवानगी दिली आहे, भूसंपादनाला नाही. याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार आणि शेतकरी यांची एकत्रित बैठक घेऊन मार्ग काढला जाईल.’ असे आश्वासन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिले.
खानवडी येथे झालेल्या बाधित शेतकऱ्यांचा संवाद मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, विजय कोलते, सुदाम इंगळे, माणिक झेंडे, दत्ता झुरंगे, दत्ता चव्हाण आदी उपस्थित होते .
शरद पवार म्हणाले, ‘विमानतळ करताना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्याबरोबर कायम राहणार आहे. आम्ही नवीन जागा बघितली होती. मात्र, नंतर सरकार बदलले. त्यांनी जागा नामंजूर केली. केंद्रातही सरकार त्यांचेच होते. पुन्हा त्यांनी पहिल्याच जागेवर विमानतळ करण्याचे ठरवले. शेतकऱ्यांनी मोजणीला परवानगी दिलेली आहे. जागा घ्यायला परवानगी दिलेली नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या विषयावर मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि शेतकरी यांची एकत्रित बैठक घेऊन मार्ग काढला जाणार आहे.’
‘मुंबई विमानतळाला जागा देताना शेतकऱ्यांना १२ टक्क्यांऐवजी २२ टक्के एकरी परतावा देण्याचा निर्णय आम्ही घेतला. हिंजवडी येथील आयटी पार्क, मगरपट्टा पार्क बाजारभावाने दिले. आता शेतकऱ्यांना दरवर्षी एकरी लाख रुपये मिळतात. ५० वर्षे ही रक्कम मिळणार आहे. अशा पद्धतीचा मार्ग काढून शेतकऱ्याला योग्य न्याय देण्यात येईल,’ असही पवार म्हणाले. ‘शेतकरी हा केंद्रबिंदू मानून योग्य मार्ग काढला जाणार आहे. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असून अद्याप कर्जमाफी झालेली नाही.’ असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सागितले.
भर पावसात शेतकऱ्यांशी संवाद
खानवडी येथे ज्येष्ठ नेते शरद पवार आल्यावर या परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. भर पावसात पवार यांनी खानवडीतील महात्मा फुले स्मारक येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव, वनपुरी ,उदाचीवाडी, कुंभारवळण या गावांतील शेतकऱ्यांशी चर्चा केली. सुमारे दीड तास त्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
