रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेवर मात करत टी-२० विश्वचषकाचं जेतेपद पटकावलं आहे. भारताने शनिवारी (२९ जून) बार्बाडोस येथे खेळवण्यात आलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करून टी-२० विश्वचषक २०२४ जिंकत भारतातला गेल्या ११ वर्षांपासूनचा आयसीसी चषकाचा दुष्काळ संपवला. यासह कर्णधार रोहित शर्मा आणि दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली या दोघांनी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रोहित आणि विराटच्या चाहत्यांना या बातमीने वाईट वाटलं असलं तरी दोघेही उत्तम फॉर्ममध्ये असताना आणि भाताने विश्वचषक उंचावल्यानंतर ही घोषणा केल्यामुळे अनेकांना त्यांचा निर्णय योग्य वाटतोय. नव्या खेळाडूंना संधी मिळावी यासाठी निवृत्ती घेत असल्याचं दोघांनीही जाहीर केलं.

कपिल देव (१९८३) आणि एमएस धोनी (२००७ आणि २०११) त्यानंतर ३७ वर्षीय रोहित शर्मा हा विश्वचषक जिंकणारा केवळ तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. यासह भारतीय संघाने रोहितच्या नेतृत्वात ५० टी-२० सामने जिंकले आहेत. याबाबतीत रोहितने सर्व कर्णधारांना मागे टाकलं आहे. तसेच रोहितच्या नेतृत्वाखाली भारत एकही सामना न गमावता टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिलाच संघ ठरला आहे. तर विराट टी-२० विश्वचषक स्पर्धांमध्ये सर्वाधिक धावा ठोकणारा फलंदाज बनला आहे.

दरम्यान, रोहित आणि विराटने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अनेकांनी त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी देखील विराट-रोहितला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही रोहित-विराटला शुभेच्छा दिल्या आहेत. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही अतिशय उत्तम खेळाडू आहेत. त्यांनी या टप्प्यावर निवृत्ती घेतली ही खूप चांगली गोष्ट आहे. एका विशिष्ट काळानंतर खेळाडू आपला फॉर्म गमावून बसतात. मात्र, या दोघांनी उत्तम फॉर्ममध्ये असताना निवृत्त व्हायचा निर्णय घेतला आहे, जो योग्यच आहे. या दोघांचं जागतिक क्रिकेटमधलं योगदान मोठं आहे. या दोघांनी जागतिक क्रिकेटमध्ये भारताची प्रतिष्ठा वाढवली आहे. मात्र आता त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. आता नव्यांना संधी मिळावी म्हणून ते दोघं निवृत्त होत आहेत. त्यांची ही भूमिका अभिमानास्पद आहे. माझ्या मते त्यांनी घेतलेला हा निर्णय योग्यच आहे.

हे ही वाचा >> IPL मधील ‘त्या’ सामन्यानंतर ढसाढसा रडणारा, आतून कोलमडलेल्या कुल’दीप’ने कसं केलं पुनरागमन?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित-विराटची टी-२० क्रिकेटमधील कामगिरी

विराट कोहलीने आतापर्यंत १२५ टी-२० सामन्यांमध्ये ४८.७ च्या सरासरीने आणि १३७ च्या स्ट्राईक रेटने ४,१८८ धावा जमवल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि ३८ अर्थशतकांचा समावेश आहे. तर रोहित शर्माने १५९ टी-२० सामन्यांमध्ये ३२ च्या सरासरीने आणि १४१ च्या स्ट्राईक रेटने ४,२३१ धावा जमवल्या आहेत. यात ५ शतकं आणि ३२ अर्थशतकांचा समावेश आहे.