पुणे : ‘शिवाजीनगर बस स्थानकाचे बांधकाम महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनकडूनच (महामेट्रो), तर स्वारगेट बस स्थानकाचे काम महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) सार्वजनिक-खासगी-भागीदारी (पीपीपी) तत्त्वानुसार करण्यात येणार आहे,’ अशी स्पष्टोक्ती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी दिली. ‘पुढच्या तीन वर्षांत दोन्ही बस स्थानकांची पुनर्बांधणी करून कायापालट झाला असेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

परिवहनमंत्री सरनाईक सोमवारी (१५सप्टेंबर) पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी लोणावळा, शिवाजीगर आणि स्वारगेट बस स्थानकाला भेट देऊन स्वच्छता-सुविधांची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ‘एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक अरुण सिया आणि इतर अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.’

सरनाईक म्हणाले, ‘शिवाजीनगर बसस्थानकाची काही जागा ‘महामेट्रो’ला करारानुसार दिली आहे. मधल्या काळात दोन्ही विभागांमध्ये विसंवाद झाला होता. मात्र, ‘महामेट्रो’कडूनच शिवाजीनगर बस स्थानकाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ठेवला आहे. पुढील महिन्यात ‘पीपीपी’ तत्त्वानुसार जागा विकसित करण्यासंदर्भात बैठक होणार असून, त्यावर निश्चिती करण्यात येणार आहे.’ ‘शिवाजीनगर बस स्थानक गेल्या आठ वर्षांपासून वाकडेवाडी येथे स्थलांतरित करण्यात आले असल्याने पुण्यातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याची कल्पना आहे. मात्र, पुढच्या तीन वर्षांत अत्याधुनिक सुविधांनी युक्त बस स्थानक मूळ जागेवर असेल,’ असे ते म्हणाले.

‘आरे डेअरी’च्या जागेवर (वाकडेवाडी) स्थलांतरित करण्यात आलेल्या बस स्थानकावर अनेक गैरसोयी आहेत. प्रवाशांना मुबलक पाणी आणि खाद्य पदार्थांचे गाळे सुरू करण्यासाठी तीन वर्षाच्या मुदतीसाठी परवानगी द्यावी, असा प्रस्ताव आरे डेअरी संस्थेकडे पाठविण्यात येणार आहे,’ असेही सरनाईक यांनी सांगितले.

दरम्यान, ‘शिवाजीनगर बस स्थानकाचे बांधकाम जीर्ण होत आले असून, अपुरे पडत आहे. भविष्यात इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या, चार्जिंग करण्यासाठी सुविधा आणि प्रवाशांचा प्रतिसाद पाहता हे स्थानकही ‘पीपीपी’ तत्त्वानुसार विकसित करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

‘भारत जिंकल्याने संजय राऊत यांना दु:ख’

‘दुबई येथील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) नेत्यांनी विरोध दर्शविला, तरी त्यांच्या घरात रात्री आठनंतर ‘टीव्ही’ सुरू होता,’ अशा शब्दांत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी संजय राऊत यांना टोला लगावला, तर हा सामना भारताने जिंकला म्हणून राऊत यांना दु:ख झाले, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.