पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला असून, राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून या किल्ल्यांना जोडण्यासाठी ज्योतिर्लिंग यात्रेप्रमाणे ‘शिवतीर्थ यात्रा’ सुरू करण्यात यावी. सांस्कृतिक आणि परिवहन मंत्र्यांच्या हस्ते शिवनेरी किल्ल्यावरून या यात्रेचा शुभारंभ करण्यात यावा, अशी मागणी सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
संस्थेचे अध्यक्ष राहुल जोशी यांनी निवेदनाद्वारे ही माहिती दिली. राज्यातील शिवनेरी, रायगड, प्रतापगड, पन्हाळ्यासह ११ किल्ले आणि कर्नाटकातील जिंजी अशा बारा किल्ल्यांचा समावेश युनोस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये केला. त्यामुळे या किल्ल्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे किल्ल्यांना जोडण्यासाठी आणि पर्यटकांच्या सोयीसाठी ज्योतिर्लिंग यात्रेच्या धर्तीवर ‘शिवतीर्थ यात्रा’ सुरू करण्यात यावी. त्यात विशेष रंगसंगतीच्या बसेस उपलब्ध कराव्यात. तसेच यात्रेची सुरुवात सांस्कृतिक आणि परिवहन मंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरून करण्यात यावी, अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
जोशी म्हणाले, ‘सह्याद्री गिरिभ्रमण संस्था गेल्या २५ वर्षांपासून गड किल्ले पुरातत्व वारसा, पर्यावरण आणि पर्यटन क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून किल्ले शिवनेरीवर ‘शिवाई-देवराई’ आणि जुन्नर पुरातत्व संग्रहालय साकारण्यात आले आहे. तसेच ‘शिवनेरी’वरील अंबरखाना इमारतीमध्ये संग्रहालय आणि माहिती केंद्र साकारण्यात येत आहे.
यापूर्वी संस्थेच्या माध्यमातून गड किल्ले पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘एसटी’द्वारे गड किल्ले एकमेकांना जोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार शिवनेरी ते रायगड बससेवा सुरूही झाली होती. मात्र, कालांतराने ती खंडित झाली. आता ‘युनेस्को’च्या मानांकनामुळे शिवभक्तांची गड किल्ल्यांना भेटी देण्याची संख्या वाढणार आहे. त्यासाठी शिवतीर्थ यात्रेची सुरुवात करण्याची गरज आहे.’
भारत गौरव यात्रेत ‘शिवनेरी’चा समावेश
भारतीय रेल्वेच्या ‘भारत गौरव यात्रे’च्या माध्यमातून शिव प्रेरणस्थळे जोडणाऱ्या योजनेत किल्ले शिवनेरीच्या समावेशाची मागणी संस्थेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. त्यानुसार नुकतीच ही यात्रा शिवनेरीवर आली. या यात्रेच्या माध्यमातून देशातील सुमारे ७५० पर्यटकांनी शिवनेरीला भेट दिली, असेही राहुल जोशी यांनी सांगितले.
जुन्नरचे बसस्थानक ‘हेरिटेज’ स्वरूपाचे करा
जुन्नरचे ‘एसटी’ बसस्थानक नव्याने बांधण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे बसस्थानक प्राचीन जुन्नर, किल्ले शिवनेरी आणि नाणेघाटाला साजेसे ‘हेरिटेज’ स्वरूपाचे असावे, अशी मागणी सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने मुख्यमंत्र्यांसह परिवहन मंत्र्यांकडे करण्यात आली असल्याचे राहुल जोशी यांनी सांगितले.