scorecardresearch

कोणी आम्हाला छेडले, तर सोडणार नाही!; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

भारत पूर्णपणे सुरक्षित आहे. जगातील कोणतीच ताकद भारताकडे डोळे वर करून पाहू शकत नाही.

पुणे : भारत पूर्णपणे सुरक्षित आहे. जगातील कोणतीच ताकद भारताकडे डोळे वर करून पाहू शकत नाही. आम्ही कोणाला छेडणार नाही. मात्र कोणी आम्हाला छेडले तर सोडणार नाही, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला.  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामांमुळे गेल्या पाच वर्षांत देश आर्थिक श्रेणीत अग्रेसर आहे, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने भाजप शहर पदाधिकाऱ्यांशी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी संवाद साधला.

भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्यासह युवा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. संघटन ही भाजपची शक्ती आहे. सरकार स्थापन करण्यासाठी भाजप राजकारण करत नाही. तर देश तयार करण्यासाठी भाजप राजकारण करत आहे. भाजप हा देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठा पक्ष आहे, याची जाणीव पदाधिकाऱ्यांनी ठेवावी. त्यामुळे पदाधिकाऱ्यांची जबाबदारी मोठी आहे. समाजाप्रती आणि देशाप्रती असलेली जबाबदारी विसरू नका, असे राजनाथ सिंह यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

युद्धामुळे महागाई

करोना काळात मोदी सरकारने अर्थव्यवस्था कोसळू दिली नाही. त्यामुळे महागाईवर नियंत्रण आहे. युक्रेन-रशिया युध्दामुळे काही प्रमाणात महागाई वाढली आहे. या युद्धाचा परिणाम अनेक देशांवर झाला आहे. अमेरिकेमध्येही प्रचंड महागाई झाली आहे. त्याचे परिणाम देशातही दिसणे सहाजिक आहे. त्यातुलनेत देशातील परिस्थिती चांगली आहे, असा दावाही राजनाथ सिंह यांनी केला.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Someone teases us we will not leave defense minister rajnath singh warning ysh