दत्ता जाधव

पुणे : उशिराने झालेल्या पेरण्या, ऑगस्टमध्ये पावसाने दिलेली ओढ आणि पावसाअभावी यलो मोझॉक रोगाचा, अळीच्या झालेल्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन उत्पादनात पन्नास टक्क्यांहून जास्त घट येत आहे. त्यात भर म्हणून बाजारात हमीभावाइतकाही दर मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

यंदाच्या खरीप हंगामात पुरेशा पावसाअभावी पेरण्या उशिराने झाल्या. जुलैच्या अखेरीस पेरण्या झाल्या. वाढीच्या, फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली. त्यामुळे सोयाबीनची अपेक्षित वाढ झाली नाही. शेंगा भरल्या नाहीत. सोयाबीनचे दाणे लहान राहिले आहेत. ऑगस्टमधील उघडीप आणि उष्णतेमुळे यलो मोझॉक रोगाचा प्रादुर्भाव झाला. पिके पिवळी पडली, अनेक ठिकाणी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आलेल्या शेंगाही अळ्यांनी कुर्तडून टाकल्या आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून सोयाबीन उत्पादनात पन्नास टक्क्यांहून जास्त घट येत आहे.

आणखी वाचा-बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

खरीप हंगामात उत्पादीत होणाऱ्या सोयाबीनला केंद्र सरकारने ४६०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला होता. यंदा प्रत्यक्षात सोयाबीनला सरासरी ४५०० रुपये दर मिळत आहे. मागील वर्षी सोयाबीन सरासरी ५५०० रुपयांनी विकले जात होते. हंगामाच्या अखेरीस प्रति क्विंटल दर सात हजार रुपयांवर गेला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन खर्चात वाढ झालेली असतानाही दर मात्र कमी मिळत आहे. उत्पादन खर्चात झालेली वाढ, उत्पादनात होत असलेली घट, मजुरीत झालेली वाढ आणि हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची चहू बाजूने कोंडी होत आहे.

सोयाबीन खरिपातील मुख्य पीक

राज्यातील खरीप हंगामातील पेरणीचे क्षेत्र सुमारे १५१.३३ लाख हेक्टर आहे. त्यापैकी यंदा १४१.३१ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा पावसाअभावी कडधान्य, अन्नधान्यांच्या पेरणींची वेळ निघून गेल्यामुळे शेतकरी सोयाबीन लागवडीकडे वळाले होते. यंदा ५५ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. सोयाबीनचे क्षेत्र राज्यात सर्वदूर आहे आणि सर्वत्र उत्पादकतेत मोठी घट झाली आहे. सरासरी एकरी आठ ते अकरा क्विंटल उत्पादन होते, यंदा केवळ चार ते सात क्विंटल उत्पादन होत आहे. सोयाबीनचा एकरी खर्च ३० हजार रुपयांवर गेला आहे. त्यात काढणी, मळणीच्या खर्चाची भर घालता एकरी खर्च ३५ हजार रुपयांवर जातो. मात्र, सध्या मिळत असलेले सोयाबीन उत्पादन पाहता शेतकऱ्यांनी घातलेला खर्चही निघत नाही, अशी माहिती साखरखेर्डा (ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) येथील शेतकरी देवीदास पांचाळ यांनी दिली.

आणखी वाचा-पुणे-दौंड रेल्वे प्रवास स्वस्तात! मार्गावर लोकल सेवा सुरु होणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिवाळीपूर्वी पीकविमा भरपाई मिळणार

खरीप हंगामात पीकविम्यासाठी दाखल झालेल्या अर्जापैकी सर्वाधिक अर्ज सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचेच आहेत. ऑगस्ट महिन्यात पावसात खंड पडल्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. पीकविमा नुकसानीच्या निकषात बसलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याचे नियोजन आहे, असे कृषी विभागाचे मुख्य सांख्यिक विनय कुमार आवटे यांनी सांगितले.