पुणे : दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवासाठी पुण्यातून कोकणात जाणाऱ्यांचे नियोजन सुरू झाले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) स्वारगेट आणि चिंचवड स्थानकातून कोकणातील सर्व बसचे आरक्षण दोन महिन्यांपूर्वीच संपले आहे. महामंडळाने नेहमीप्रमाणे यंदाही पुणे विभागातून सुमारे २५० ते ३०० अतिरिक्त ‘एसटी’ कोकणाच्या मार्गावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास आणखी सुलभ होणार आहे.

गेल्या वर्षी पुणे विभागातून कोकणात एसटीच्या २५१ अतिरिक्त फेऱ्या झाल्या होत्या. ‘एसटी’ महामंडळाला ५९ लाख ७५ हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले होते. यामध्ये स्वारगेट बस स्थानकातून १२४, तर चिंचवड स्थानकातून १२७ फेऱ्यांचा समावेश असून चिपळूण, दापोली, रत्नागिरी, खेड, देवरुख, मंडणगड, तिवरे, सिंधूदुर्ग, लांजा या मार्गावर गाड्या सोडण्यात आल्या होत्या.

गणरायाच्या उत्सवासाठी कोकणात जाण्याची परंपरा असलेल्या हजारो भाविकांनी यंदाही आधीच नियोजन सुरू केले आहे. स्वारगेट व चिंचवड स्थानकांवरून कोकणातील विविध शहरांकडे जाणाऱ्या नियमित गाड्यांच्या जागा भरल्याने, अतिरिक्त गाड्यांची मागणी करण्यात येत आहे. त्यानुसार महामंडळाने यावर्षी ही मागणी ओळखून २५० ते ३०० जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.

याबरोबरच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग प्रवाशांसाठी सवलतीही लागू असणार आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांनी अतिरिक्त गाड्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. महामंडळाच्या संकेतस्थळावर आणि मोबाईल ॲपवर या गाड्यांची माहिती उपलब्ध होणार आहे. विशेषत: प्रवाशांनी शक्यतो समूह आरक्षण किंवा आगाऊ आरक्षण करावे, जेणेकरून अतिरिक्त एसटी सोडण्याचे नियोजन करणे सोपे जाईल, असे आवाहन एसटी महामंडळाचे पुणे विभाग नियंत्रक अरूण सिया यांनी केले.

मुंबई-पुण्यातून कोकणात जाताना मार्गावर घाट, तीव्र वळणाचे रस्ते आणि चढ-उतार असतात. पावसामुळे अनेकदा प्रवासात अडथळे येतात. एसटीमध्ये तांत्रिक बिघाड होतो. त्यामुळे प्रवाशांना दीर्घ काळ ताटकळत बसावे लागते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रमुख मार्गांवर दुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार आहे, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली बस स्थानके आणि थांब्यांवर २४ तास कर्मचारी सेवा उपलब्ध ठेवण्याचे आदेशही परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आणखी सुकर होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गणेशोत्सवानिमित्त कोकणातील ‘एसटी’चे आरक्षण पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आणखी अडीचशे जादा गाड्या कोकण मार्गावर सोडण्याचे नियोजन आहे. गणेश चतुर्थी २७ ऑगस्ट रोजी असल्याने दोन्ही आगारातून २२ ऑगस्टपासूनच एसटीचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांच्या आरक्षणानुसार गाड्या सोडण्यात येईल.-अरूण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, पुणे