कार्यालयापासून थेट आपल्या शहरात पोहोचता येणार

पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्र (आयटी पार्क) फेज तीन ते छत्रपती संभाजीनगर अशी ‘काॅर्पोरेट कनेक्ट एक्सप्रेस’ ‘एसटी’ सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंजवडी येथून नाशिक व कोल्हापूर या मार्गांवर एसटी सेवा सुरू आहे. त्यात आता आजपासून (६ जून) छत्रपती संभाजीनगरपर्यंत सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असून, कार्यालयापासून वातानुकुलित ‘शिवनेरी’द्वारे थेट छत्रपती संभाजीनगरपर्यंत प्रवास करता येणार आहे.

हिंजवडी येथे सर्वांत मोठे आयटी क्षेत्र असल्याने राज्यासह देश-परदेशातील तरुण-तरुणी येथील कंपन्यांमध्ये नोकरीसाठी येतात. शनिवार, रविवार दोन दिवस सुटीच्या दिवशी आयटीतील बहुतांश कर्मचारी आपापल्या गावी जातात. विशेषत: नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील तरुणांची सुटीच्या दिवशी ये-जा सुरू असते. त्यामुळे हिंजवडी फेज तीन परिसरातून नाशिक आणि कोल्हापूर ‘एसटी’ सेवा सुरू असून, या सेवेला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर किंवा त्या मार्गावरील कर्मचाऱ्यांना गावी जाण्यासाठी वाकडेवाडी बस स्थानक किंवा स्वारगेट बस स्थानकापर्यंत यावे लागत होते.

दैनंदिन काम आटोपून पुन्हा बस स्थानकापर्यंतचा प्रवास वाहतूककोंडीतून करावा लागत असल्याने छत्रपती संभाजीनगरपर्यंत एसटी सुरू करावी, अशी मागणी आयटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या शिवाजीनगर आगारातून आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी वातानुकूलित शिवनेरी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. – अरुण सिया, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असे आहे फेऱ्यांचे नियोजन

हिंजवडी फेज तीन येथून शिवनेरी बस दर शुक्रवारी सायंकाळी ६.०० वाजता सुटेल, तर दर सोमवारी छत्रपती संभाजीनगर बस स्थानकातून पहाटे ४.३० वाजता सुटेल. या सेवेचा फायदा हिंजवडी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनाही होईल.