पुणे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, याचा आनंद साजरा करताना तो केवळ उत्सवी पातळीवर न राहता, भाषेला आणखी पुढे घेऊन जाणारा असावा, या उद्देशाने ‘लोकसत्ता’ने एक वेगळा मार्ग चोखाळला; मराठी माध्यमात शिकून वेगवेगळ्या क्षेत्रांत कर्तृत्वगाथा रचणाऱ्यांच्या खऱ्या कहाण्या सगळ्यांपर्यंत पोहोचविण्याचा. या सगळ्या कहाण्यांचे एक देखणे आणि आशयसंपन्न पुस्तक तयार झाले आहे, ‘मराठीने घडवलेले’. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ येत्या शुक्रवारी, २१ मार्चला पुण्यात होत आहे.

मराठी माध्यमात शालेय शिक्षण घेऊन नंतर आपापल्या क्षेत्रात स्व-कर्तृत्वाने स्वत:ची ओळख घडविणारे अनेक मराठी जन आहेत. ‘केपीआयटी’चे रवी पंडित, ‘एनआयए’चे महासंचालक सदानंद दाते, प्रसिद्ध रागसंगीत गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, लेखक-अभिनेता-दिग्दर्शक भरत दाभोळकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण गवई, अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर, स्त्रीरोगतज्ज्ञ प्रा. डॉ. निखिल दातार ही काही वानगीदाखल उदाहरणे. या सर्वांसह अशा ३० जणांच्या कहाण्या या पुस्तकात समाविष्ट आहेत. ‘लोकसत्ता’ कायमच वैविध्यपूर्ण आशय-विषयांवर उत्तम दस्तावेजमूल्य असलेल्या पुस्तकांची निर्मिती करतो. त्याच मालेतील ही आणखी एक गुंफण आहे. येत्या २१ मार्चला होणाऱ्या प्रकाशन कार्यक्रमानिमित्त ज्येष्ठ नाटककार, लेखक, दिग्दर्शक डॉ. सतीश आळेकर यांचे प्रमुख भाषण होणार आहे. त्याचबरोबर ‘आम्हाला मराठीने असे घडवले…’ या विषयावर परिसंवाद होणार असून, ज्येष्ठ उद्याोजक दीपक घैसास, अभिनेता गिरीश कुलकर्णी आणि सनदी अधिकारी अभिजित बांगर त्यात सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठी आहे.

● मुख्य प्रायोजक : ग्रॅव्हिटस फाउंडेशन

● सहप्रस्तुती : कौटिल्य मल्टीक्रिएशन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● सहप्रायोजक : मगरपट्टा सिटीज ग्रुप, भारती विद्यापीठ, पुणे, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड