लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: भटक्या कुत्र्यांच्या उच्छादाने नागरिक त्रस्त झाले असून जिल्ह्यातील मंचर येथे कुत्र्यांनी १७ जणांवर जीवघेणा हल्ला केला आहे. त्यामध्ये दहा लहान मुले, पाच पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात यातील पाच जणांचे लचके तोडले गेले आहेत. त्यापैकी काही जणांवर औंध रुग्णालय येथे तर, काहींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अंशुमन किरण गुंजाळ या दहा वर्षीय मुलाच्या दोन्ही गालांवर मोठ्या जखमा झाल्या आहेत. तर, फजल अब्बास मीर या पाच वर्षांच्या मुलाच्या मानेला मोठी जखम झाली आहे. गावातील पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला आहे. या कुत्र्याचा शोध घेऊन शुक्रवारी (१४ एप्रिल) संध्याकाळी पिसाळलेल्या कुत्र्याला ठार करण्यात मंचर नगरपंचायतीला यश आले आहे.

आणखी वाचा- पिंपरी: घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार आणि धोकादायक पद्धतीने रिफिलिंग करणारे चौघे गजाआड

आरुष अक्षय मनकर, मिजल हक, शहाअली इमाजअली मीर, कृष्णा समाधान गांगुर्डे, रिजवान मुश्ताक शेख, मंजर सईद शेख, सुनील नथू धीमते, संजय पांडुरंग पडघणे, विलास भगवान बोऱ्हाडे, अनुसया अंकुश बढे यांच्यावर कुत्र्याने हल्ला केला आहे. या सगळ्यांवर उपचार सुरू आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही दिवसांपासून मंचर शहरात कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी पिसाळलेल्या एका कुत्र्याने काही जणांवर हल्ला केला होता. त्यानंतर हल्ले वाढतच गेले. मात्र, या सगळ्यात नगरपंचायतीने बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे हल्ल्यांमध्ये वाढ झाली. वेळेतच कुत्र्याचा योग्य बंदोबस्त केला असता तर हल्ल्यांपासून बचाव झाला असता. मात्र, दुर्लक्ष केल्याने लहान मुलांवरील हल्ले वाढले, असा आरोप नागरिकांनी केला आहे.