पुणे : मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला बेमुदत संप सुरूच आहे. या संपात पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) बहुतांश कर्मचारी सहभागी झाल्याने कामकाज ठप्प झाले आहे. याचा फायदा मध्यस्थांनी घेतला असून, नागरिकांकडून जादा पैसे उकळण्याचे काम ते राजरोसपणे करीत आहेत.

पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सुमारे ७५ कर्मचारी २४ सप्टेंबरपासून संपावर आहेत. या संपामुळे नवीन वाहन परवाना वितरण, वाणिज्य वाहनांची नोंदणी, वाहन परवाना नूतनीकरण, वाहन परवान्यावरील पत्ता बदलणे, वाहनाची मालकी हस्तांतरित करणे, वाहनावरील कर्जाचा बोजा उतरविणे यासह अनेक सेवा बंद आहेत. हा संप आरटीओतील मध्यस्थांच्या पथ्यावर पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अनेक मध्यस्थ आरटीओमध्ये आलेल्या नागरिकांकडून जादा पैसे उकळून त्यांची कामे संपाच्या काळातही करून देण्याचे आश्वासन देत आहेत. त्यामुळे शासकीय कामकाज बंद असताना मध्यस्थांसाठी खास मार्गाने ते सुरू असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.

हेही वाचा >>>पुण्यात सप्टेंबर महिन्याचा पाऊस फक्त दोन तासांत जाणून घ्या, पुण्यात आज किती पाऊस पडणार

पुणे आरटीओ कार्यालयातील सेवांसाठी दररोज सुमारे १ हजार ते १ हजार २०० नागरिक अर्ज करतात. या संपामुळे या नागरिकांची आरटीओतील काम खोळंबली आहेत. काही नागरिकांना तातडीने कामे पूर्ण करण्याची निकड असते. असे नागरिक आरटीओ कार्यालयात येत आहेत. कार्यालयात मदत कक्ष आहे मात्र, तिथे अनेक वेळा कर्मचारीच उपस्थित नसतो. कार्यालयात आलेल्या नागरिकांना हेरून मध्यस्थ त्यांचे काम करून देण्याचे आश्वासन देत आहेत. त्यासाठी नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम ते घेत आहेत. याकडे आरटीओतील वरिष्ठ अधिकारी केवळ बघ्याच्या भूमिकेतून पाहत आहेत.

हेही वाचा >>>पंतप्रधानांच्या सभास्थळी चिखल, उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी; जेसीबीच्या साहाय्याने खडी टाकून…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागणीवर अद्याप राज्य सरकारने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आमचा संप कायम आहे. पुण्यातील आरटीओ कार्यालयात दररोज सुमारे बाराशेहून अधिक नागरिकांच्या अर्जावर कार्यवाही केली जाते. सध्या हे काम ठप्प झाले आहे.- जगदीश कांदे, राज्य कार्याध्यक्ष, मोटार वाहन कर्मचारी संघटना