पुणे : शहरातील विविध भागांत असलेल्या पुलांची संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यासाठी सल्लागार म्हणून ‘स्ट्रक्टॉनिक कन्सल्टिंग इंजिनिअर्स’ यांना काम देण्यास शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. कंपनीने सर्वांत कमी दराने १ कोटी १८ लाखांमध्ये काम करण्याची तयारी दाखविल्याने त्यांना हे काम देण्यात आले.
शहरात एकूण ८६ मोठे, तर १७० लहान पूल आहेत. त्यांपैकी केवळ ३८ पुलांचे संरचनात्मक लेखापरीक्षण करण्यात आले आहे. त्यांपैकी ११ पुलांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. उर्वरित पुलांच्या संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली.
शहरातून ४४ किलोमीटर लांब मुळा-मुठा नदी वाहते. या दोन्ही नद्यांमध्ये ब्रिटिशकालीन पूल आहेत. त्यात गेल्या काही वर्षांत नवीन पुलांची भर पडली आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहराचे दोन्ही भाग जोडण्यासाठी महापालिकेच्या विकास आराखड्यात नव्याने पूल सुचविले आहेत. शहराचा वाढत असलेला विस्तार आणि दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली वाहतुकीची समस्या यामुळे पुलांची संख्या वाढवून पर्यायी मार्ग तयार करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. याबरोबरच शहरातील नवीन आणि जुन्या पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या पुलांचे संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
महापालिकेने २०१३-१४ मध्ये १८ नद्यांवरील पुलांचे, तर २०१८-१९ मध्ये १२ पूल आणि उड्डाणपुलांची संरचनात्मक तपासणी पूर्ण केली आहे. त्यानंतर शहरातील २० वर्षांपेक्षा जुन्या ३८ पुलांची तपासणी २०२१ मध्ये महापालिकेने केली.
सर्व प्रकारच्या पुलांचा समावेश
नदीवरील ३२ पूल, २० उड्डाणपूल, ९ रेल्वे उड्डाणपूल या प्रमुख पुलांची संख्या ६१ आहे. आतापर्यंत ३८ पुलांचे संरचनात्मक लेखापरीक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित पुलांचे संरचनात्मक लेखापरीक्षण करण्यात आलेले नाही. त्यामुळे महापालिकेने निविदा मागविली होती. यामध्ये १ कोटी १८ लाखांची निविदा सर्वांत कमी दराने आली होती.