पुणे : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी प्राथमिक शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आधारकार्ड नसल्यास प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल का, आधार कार्ड काढताना मिळणाऱ्या पावतीवर प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल का, याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शालेय शिक्षण विभागाकडे मार्गदर्शन मागवले आले आहे. याबाबत शिक्षण विभागाकडून सूचना आल्यावर दोन दिवसांत विद्यार्थी नोंदणी सुरू करण्यात येणार आहे.

आरटीईअंतर्गत विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया २० फेब्रुवारीपासून सुरू होणार होती. मात्र, सरकारी लाभांच्या योजनांसाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. आरटीई प्रवेश प्रक्रिया ही सरकारी योजना आहे. आरटीई प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्यास ते प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहू शकतात. या पार्श्वभूमीवर मुलांकडे आधारकार्ड नसल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल का, आधारकार्ड काढताना मिळणाऱ्या पावतीवर प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल का, याबाबत शिक्षण विभागाकडे मार्गदर्शन मागवण्यात आले आहे. त्याबाबत दोन दिवसांत सूचना प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन दिवसांत प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे. आरटीई प्रवेशांबाबतची माहिती https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

हेही वाचा – पुणे : पेठा, मध्यवर्ती भागासह काही भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

हेही वाचा – “पहाटेची शपथ हा अजित पवारांचा स्वार्थीपणा”, रावसाहेब दानवेंची टीका; म्हणाले, “गणिते..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरटीई प्रवेश प्रक्रियेत सहभागी न होणाऱ्या शाळांवर कारवाई

आरटीई प्रवेश प्रक्रियेत राज्यातील शाळांची नोंदणी जवळपास पूर्ण झाली आहे. प्रवेश प्रक्रियेत जाणीवपूर्वक समाविष्ट न होणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे काही शाळांना स्वयंचलित संगणकीय प्रणालीद्वारे प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्यात येत असल्याचे गोसावी यांनी स्पष्ट केले. आरटीई संकेतस्थळावरील माहितीनुसार, आठ हजार ८२० शाळांनी नोंदणी पूर्ण केली आहे. त्याद्वारे १ लाख १ हजार ८८१ जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत.