पुणे : राज्यातील दुसरी ते आठवीच्या पुस्तकांना जोडलेल्या वह्यांच्या कोऱ्या पानांना विद्यार्थ्यांची पसंती मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) केलेल्या सर्वेक्षणात ९७ टक्के शिक्षक, ९१. ७७ टक्के पालकांनी, ६८.९० टक्के विद्यार्थ्यांना कोरी पाने आवडत असल्याचे सांगितले आहे. तसेच सर्वेक्षणातून अनेक विद्यार्थ्यांना एकात्मिक पाठ्यपुस्तके मिळाली नसल्याचेही समोर आले.
बालभारतीने यंदापासून पहिली ते आठवीपर्यंतच्या पुस्तकांच्या रचनेत बदल केला. त्यात दुसरी ते आठवीच्या पुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडण्यात आली. या कोऱ्या पानांवर विद्यार्थ्यांनी महत्त्वाच्या नोंदी करणे अपेक्षित आहे. या उपक्रमाची उपयोगिता तपासण्यासाठी बालभारतीकडून शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले. त्यात एकात्मिक पाठ्यपुस्तके, वह्यांच्या पानाचा उपयोग या अनुषंगाने १२ प्रश्न विचारण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा अहवाल बालभारतीकडून जाहीर करण्यात आला.
हेही वाचा >>> ललित पाटील प्रकरणात महिला पोलीस उपनिरीक्षकासह दोघे बडतर्फ;आतापर्यंत चारजणांची पुणे पोलीस दलातून हकालपट्टी
वर्गात वह्यांच्या पानांवर नोंदी घेत असल्याचे ९६.४९ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले. १३.६९ टक्के विद्यार्थी कधीतरीच या पानांचा वापर करतात. पुस्तकातील पानांवर विद्यार्थ्यांनी घेतलेल्या नोंदी ९३.७२ टक्के पालक पाहतात. ३.८८ टक्के विद्यार्थ्यांच्या मते शिक्षकांनी या नोंदी पाहिलेल्याच नाहीत. ४६.४१ टक्के पालकांच्या मते विद्यार्थी या पानांचा वापर स्वयंअध्ययनासाठी वापर करतात. एकात्मिक पाठ्यपुस्तकांमुळे दप्तराचे ओझे कमी झाल्याचे ३८.२५ टक्के पालकांनी, ९६.७९ टक्के शिक्षकांनी सर्वेक्षणात सांगितले.
अनेक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळाली नसल्याचे उघड सर्वेक्षणातून अनेक विद्यार्थ्यांना सर्व पाठ्यपुस्तके मिळाली नसल्याचे उघडकीस आले. १६ हजार ३८६ विद्यार्थ्यांना सर्व चार पाठ्यपुस्तके मिळाली. तर ८४४ विद्यार्थ्यांना तीन, ३ हजार ७२९ विद्यार्थ्यांना दोन, तर १ हजार २३४ विद्यार्थ्यांना एकच पाठ्यपुस्तक मिळाले.