पुणे : राज्यातील साखर उद्योगाने बुधवारपर्यंत ५० लाख टन साखर उत्पादनाचा टप्पा पार केला आहे. १९७ कारखान्यांनी गाळप सुरू करून मागील हंगामापेक्षा सरस कामगिरी करून गाळप आणि साखर उत्पादनातही आघाडी घेतली आहे.

साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी ४ जानेवारीअखेर शंभर सहकारी आणि ९७ खासगी, अशा १९७ साखर कारखान्यांनी ५३६.७८ लाख टन उसाचे गाळप करून पन्नास लाख टन (५०५.६४ लाख क्विंटल) साखरेचे उत्पादन केले आहे.

हेही वाचा – म्हाडाच्या एकल इमारतींच्या पुनर्विकासाला चालना, तीन इमारतींचे प्रस्ताव राज्य सरकारकडे

यंदा दसरा, दिवाळी आणि परतीच्या पावसामुळे गळीत हंगाम सुरू होण्यास उशीर झाला होता. सुरुवातीच्या महिनाभरात हंगाम संथ गतीने सुरू होता. आता हंगामाने गती घेतली आहे. मागील हंगामाची तुलना करता मागील वर्षी याच दिवशी ९६ सहकारी, ९५ खासगी, असे १९१ कारखाने सुरू होते, त्यांनी ५०८.२७ लाख टन उसाचे गाळप करून ४९ लाख टन (४९५.४४ लाख क्विंटल) साखर उत्पादन केले होते. यंदा १०० सहकारी आणि ९७ खासगी, असे १९७ कारखाने सुरू झाले आहेत. त्यांनी ५३६.७८ लाख टन उसाचे गाळप करून ५०५.६४ लाख क्विंटल म्हणजे पन्नास लाख टन साखरेचे उत्पन्न घेतले आहे.

कोल्हापूर साखर विभाग आघाडीवर

कोल्हापूर साखर विभागाची गाळप आणि साखर उत्पादनात आघाडी कायम आहे. कोल्हापूर विभागाने १२४.४८ लाख टन उसाचे गाळप करून तेरा लाख टन (१३५.३६ लाख क्विंटल) साखरेचे उत्पन्न घेतले आहे. त्या खालोखाल पुणे सोलापूर विभागाचा क्रमांक लागतो. नागपूर विभाग सर्वात पिछाडीवर असून, केवळ चार खासगी कारखाने सुरू आहेत. त्यांनी २.१२ लाख टन उसाचे गाळप करून १.७१ लाख क्विंटल साखरेचे उत्पन्न घेतले आहे.

हेही वाचा – डॉ. संजीवनी केळकर, अशोक देशमाने यांना नातू फाउंडेशनचे पुरस्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गाळपाचा वेग जास्त आहे. राज्याची दैनदिन ऊस गाळप क्षमता साडेआठ लाख टनांवर गेली आहे. गाळप क्षमता वाढल्याचा परिणाम म्हणून यंदाचा हंगाम एप्रिलअखेर संपेल. या पुढेही कधीही मे महिन्यापर्यंत गाळप करावे लागणार नाही, अशी व्यवस्था निर्माण झाली आहे, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.