पुणे : ‘महायुतीत ‘राष्ट्रवादी’ सहभागी असली, तरी पक्ष म्हणून स्वतंत्र भूमिका आहे. ही भूमिका मांडणारा पक्षाचा जाहीरनामा; तसेच पक्षाचा कोणताही कार्यकर्ता हा विकृत मनोवृत्तीचा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा असता कामा नये, यावर चर्चा करून याबाबतचा ठराव वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात मांडला जाणार आहे.’ असे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी सांगितले. पक्षाचा २६ वा वर्धापनदिन बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात येत्या १० जूनला होणार असून, त्यानिमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी करण्यात आली आहे. तटकरे यांनी शुक्रवारी कार्यक्रमस्थळाची पाहणी करून नियोजनाची माहिती घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वर्धापनदिनाच्या सोहळ्याबाबत माहिती दिली.

‘पक्षाचा कोणताही कार्यकर्ता विकृत मनोवृत्तीचा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा असता कामा नये, अशी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी पक्षाचे पदाधिकारी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांची तातडीने हकालपट्टी करून कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या. पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यावर चर्चा करून ठरावदेखील मांडला जाणार आहे,’ असे तटकरे यांनी सांगितले.

‘महायुतीत सहभागी असला, तरी पक्ष म्हणून ‘राष्ट्रवादी’ची स्वतंत्र भूमिका आहे. ही भूमिका तसेच पक्षाचा जाहीरनामा वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात मांडला जाणार आहे. त्यामध्ये पुढील वर्षभरात पक्षाची भूमिका काय असावी, काय केले पाहिजे, कोणत्या उपक्रमांवर भर देण्याची गरज आहे, यावर चर्चा करून त्याचे सविस्तर नियोजन केले जाणार आहे. पक्षाचे काम करणारा राज्यातील स्थानिक कार्यकर्ता यासाठी उपस्थित राहावा, म्हणून समन्वयक नेमून त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे,’ असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

‘लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या यशानंतर पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीच्या यशानंतरचा हा पहिलाच वर्धापनदिन असल्याने यंदा सोहळा भव्यदिव्य करण्याचे नियोजन आहे. यासाठी राज्यातून पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह इतरांचा समावेश आहे. या कार्यक्रमासाठी २० हजार पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार असून, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत,’ असे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे शहर (पूर्व) विभागाचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, पश्चिम विभागाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, शिवाजी गर्जे, सुरेश घुले आदी उपस्थित होते.