पुणे : सारथी, बार्टी, महाज्योती यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या पीएच.डी. अधिछात्रवृत्तीसाठी बुधवारी झालेल्या चाळणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाला स्थगिती देण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने जाहीर केला. मात्र, संपूर्ण परीक्षा प्रक्रिया सर्व परीक्षा केंद्रांवर अत्यंत पारदर्शकपणे पार पाडली असून, प्रश्नपत्रिका फुटल्याचे आरोप पूर्णतः निराधार असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले.

पीएच.डी. अधिछात्रवृत्तीसाठी संयुक्त चाळणी परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे बुधवारी (१० जानेवारी) सकाळी दहा ते एक या वेळेत पुणे, कोल्हापूर, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांतील परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. मात्र या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप परीक्षार्थ्यांकडून करण्यात आला. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या सेट विभागाचे समन्वयक प्रा. बी. बी. कापडणीस यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनास स्थगिती दिल्याचा निर्णय जाहीर केला.

परीक्षेसाठी ए, बी, सी, डी अशा चार प्रश्नपत्रिका संचांची छपाई करण्यात आली होती. या प्रश्नपत्रिका संचांची छपाई दोन मुद्रणालयांकडून गोपनीयरित्या करून घेण्यात आल्याने छपाई करण्याच्या स्वरुपामध्ये बदल असू शकतो. गोपनीय पद्धतीने आणि विहित सुरक्षा मानकांचे पालन करून छपाई केलेले संच परीक्षा केंद्रांवर सीलबंद स्वरुपात पोहचवण्यात आले. प्रश्नपत्रिका संच सी आणि डी मधील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचनेमधील सूचना क्र. ३ (३) मध्ये प्रश्नपत्रिका उघडण्यासाठी प्रश्नपत्रिकेवर लावलेले सील उघडावे, सील नसलेली किंवा सील उघडलेली प्रश्नपत्रिका स्वीकारू नये, असे नमूद करण्यात आले होते.

ए आणि बी प्रश्नपत्रिका संच सील होते, परंतु सी आणि डी प्रश्नपत्रिका संच वेगळ्या मुद्रणालयाकडून छपाई करुन घेतले असल्याने ते सील नव्हते. सील प्रश्नपत्रिका न मिळाल्यामुळे काही परीक्षार्थी हे परीक्षा देऊ शकले नाहीत. त्यांच्या बाबतीत परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाली नाही. सी आणि डी संचामधील प्रत्येक प्रश्नपत्रिका संच सील नसले तरी प्रश्नपत्रिका संच असलेली पाकिटे सील होती. या पाकिटांचे सील केंद्रांवरच उघडण्यात आले.

हेही वाचा : पीएचडी अधिछात्रवृत्ती चाळणी परीक्षेचा पेपर फुटला? परीक्षार्थ्यांचा गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परीक्षा होण्यापूर्वी प्रश्नपत्रिकांची प्रत कोणत्याही व्यक्तिकडे कोणत्याही स्वरुपात (हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी) उपलब्ध नव्हती. तसेच त्या प्रश्नपत्रिकांमधील मजकूरदेखील कोणत्याही व्यक्तीला कळलेला नव्हता. संपूर्ण परीक्षा प्रक्रियादेखील सर्व परीक्षा केंद्रांवर पारदर्शकपणे पार पाडण्यात आली. त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटल्याबाबतचे आरोप हे पूर्णतः निराधार आहेत. परीक्षार्थीनी दिलेल्या निवेदनाचा विचार करता, विद्यापीठाने या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन स्थगित केले आहे, असे स्पष्ट करण्यात आले.