पुणे : अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पसार असलेल्या तस्कराला मीरा भाईंदर पोलिसांच्या पथकाने कोंढव्यातून ताब्यात घेतले. त्यावेळी अमली पदार्थ तस्कराने पोलिसांशी झटापट केली. एका पोलीस कर्मचाऱ्याचा छातीचा चावा घेतला. झटापटीत तस्कर बेशुद्ध होऊन कोसळल्याने त्याला पोलिसांच्या पथकाने त्वरीत ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच तस्कराचा मृत्यू झाल्याची माहिती ससूनमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.अझीम अबू सालेम उर्फ अझीम भाऊ (वय ५१, रा. उरण) असे मृत्यू झालेल्या तस्कराचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अझीम अबू सालेम अमली पदार्थ तस्कर आहे. त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यचान्वये (एनडीपीएस) मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत असलेल्या काशीगाव पोलिस ठाण्यात ‘एनडीपीएस’ कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला होता गेल्या काही महिन्यांपासून मीराा भाईंदर पोलीस त्याचा शोध घेत होते.
तो रत्नागिरी, कोल्हापूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी ओळख लपवून वास्तव्य करत होता. पोलिसांचे पथक त्याला पकडण्यासाठी तेथे गेले होते. मात्र, तो तेथून पसार झाला होता. तो कोंढवा भागातील हिल मिस्ट गार्डन सोसायटीत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर मीरा भाईंदरपोलिसांचे पथक पुण्यात दाखल झाले होते. या कारवाईची माहिती मीरा भाईंदर पोलिसांनी कोंढवा पोलिसांना दिली होती, तसेच कारवाईसाठी कोढवा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी घेतले होते. शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) रात्री पोलिसांनी सदनिकेत छापा टाकून कारवाई केली.
सालेमने सदनिकेचा दरवाजा आतून बंद केला होता.पोलिसांनी दरवाजा वाजविला. मात्र, त्याने दरवाजा उघडला नाही. पोलिसांनी दरवाजा तोडला गेला. सालेमने आक्रमक पवित्रा घेतला. त्याने थेट पोलिसंच्या पथकावर हल्ला केला. पोलीस हवालदार रवींद्र भालेराव यांच्या छातीचा चावा घेतला. सालेमला पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्याला त्वरीत ससून रुग्णालायत वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले. ससूनमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी त्याची तपासणी केली. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली, अशी माहिती कोंढवा पोलिसांनी दिली.
अमली पदार्थांच्या अतिरिक्त सेवनामुळे मृत्यू ?
अमली पदार्थ तस्करअझीम अबू सालेम याने अमली पदार्थांचे अतिरिक्त सेवन केल्याचा संशय आहे. अमली पदार्थांचे सेवन केल्यानंतर त्याने पोलिसांवर हल्ला चढविला. त्याला ह्रदयविकाराचा झटका आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणी, शवविच्छेदन अहवालानंतर त्याच्या मृत्यूमागचे कारण समजेल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांंगितले.