दोन फेब्रुवारी पर्यंत लोककलावंतांना तमाशा सादर करण्याची परवानगी न दिल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यावर जाऊन सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा अखिल भारतीय मराठी तमाशा परिषद अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी दिलाय. ते नारायणगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. देशभर सर्व काही सुरू आहे. मात्र, तमाशा बंद आहे अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे. या प्रशासनाने आम्हाला सावत्र वागणूक दिल्याच त्यांनी म्हटलं आहे. 

रघुवीर खेडकर म्हणाले की, “गेल्या दोन वर्षांपासून लोककलावंत हा तमाशा पासून दूरावला आहे. सध्या करोना आटोक्यात आहे. नाटक, चित्रपटगृहांना ५० टक्के मुभा देऊन ते सुरू होऊ शकतं तर तमाशा का नाही, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांकडे जाऊन आलो. मात्र, त्यांनी याची दखल घेतली नाही. महाराष्ट्र सरकार हे आमचे मायबाप आहेत. त्यांना सोडून कोणाकडे जायचं? चीन की पाकिस्तान!, त्यामुळं त्यांनी यावर लवकर तोडगा काढावा,” अशी मागणी त्यांनी केली आहे.  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर, “दुसरीकडे निवडणुका, सभा, यात्रा, या सुरू आहेत. मग, तमाशावरच निर्बंध का? प्रत्येक तमाशा फडात शंभर पेक्षा अधिक कलाकार आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून धुनी भांडी करतायेत. आर्थिक मदत आणि तमाशा सुरू करावा ही विनंती. अन्यथा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यासमोर सामूहिक आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नाही,” असं उपाध्यक्ष मंगला बनसोडे म्हणाल्या.