लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शाळा असे म्हटल्यावर विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक असे चित्र डोळ्यांसमोर येते. मात्र, सातारा जिल्ह्यातील विजयनगर (पर्यंती) जिल्हा परिषद शाळेत असे चित्र दिसत नाही. कारण या शाळेत विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याची अभिनव पद्धत वापरली जात असून, त्या माध्यमातून स्वअध्ययनाला चालना मिळत असल्याचे निरीक्षण शिक्षकांकडून नोंदवण्यात आले आहे.

विजयनगर जिल्हा परिषद शाळा दुष्काळी माण तालुक्यात आहे. पहिली ते चौथीचे वर्ग असलेल्या या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक बालाजी जाधव आणि उपशिक्षक शेशाबा नरळे कार्यरत आहेत. अध्यापन पद्धतींमध्ये असलेल्या पीअर लर्निंग (सहाध्यायी अध्ययन) या पद्धतीचा वापर करून एका विद्यार्थ्याने पूर्ण वर्गाला अध्यापन करण्याचा प्रयोग राबवला जात आहे. तिसरी आणि चौथीच्या वर्गासाठी ही पद्धत वापरली जात आहे. विद्यार्थ्यांकडूनही या अभिनव पद्धतीला प्रतिसाद लाभतो आहे.

आणखी वाचा-कोंढव्यातील बनावट दूरध्वनी केंद्र आठ वर्षांपासून – दहशतवाद विरोधी पथकाकडून तिघे अटकेत

उपक्रमाबाबत जाधव म्हणाले, की मुलांनी शिकवण्याचा प्रयोग सध्या कुठे सुरू आहे याची माहिती घेऊन काम सुरू केले. विद्यार्थ्यांना छोटे, सोपे वाटणारे विविध विषयांतील घटक निवडून ते वाचून-समजून घेण्यास सांगितले. आवश्यकतेनुसार मार्गदर्शनही करत राहिलो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत होता. विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात समोर येऊन शिक्षकाप्रमाणेच विषयातील घटक, उपघटक स्वत:च्या पद्धतीने अन्य विद्यार्थ्यांना समजावून सांगू लागले. स्मार्ट बोर्ड, टॅब्लेट या पूरक साहित्याचा वापर करू लागले. नवे साहित्य तयार करू लागले. मैदानातल्या मातीत आकार काढून आकार शिकवणे, पुठ्ठ्याच्या वस्तू तयार करून घेणे, तराजू वापरून वस्तुमान शिकवू लागले. भाषा, परिसर अभ्यास, इंग्रजी हे विषय विद्यार्थी विद्यार्थ्यांना शिकवू लागले. अवघड असलेला भाग आम्ही शिक्षक शिकवतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची अध्ययनातील गती वाढली, विद्यार्थ्यांचे शिकणे सुलभ, मजेशीर झाले. तिसरी आणि चौथीच्या ३० विद्यार्थ्यांचा उपक्रमात सहभाग आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतर विद्यार्थ्यांना शिकवता येण्यासाठी विद्यार्थी स्वत: अधिकाधिक समजून घेऊ लागले. भरपूर प्रश्न विचारू लागले, अभिव्यक्त होऊ लागले. त्यातून स्वअध्ययनाला चालना मिळण्यासह विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होण्यास मदत होत आहे, असे निरीक्षण जाधव यांनी नोंदवले.