पुणे : श्री गणेशाच्या स्वागताची तयारी सुरू झाली असून, विधिवत पूजा करून घरोघरी प्रतिष्ठापना आजपासून होणार आहे. त्यासाठी पूजा साहित्य, फुले खरेदीसाठी सोमवारी मंडई, हुतात्मा बाबू गेनू चौक परिसरात गर्दी झाली होती. उपनगरातील बाजारपेठेतही सकाळपासून नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.

गणेशोत्सवानिमित्त मार्केट यार्डातील फूल बाजारात पुणे जिल्ह्यातील यवत, सोरतापवाडी भागातून फुलांची मोठी आवक झाली. सजावटीसाठी लागणाऱ्या झेंडूची आवक सोलापूर, बीड जिल्ह्यातून आवक सुरू झाली आहे. गणेशोत्सवात फुलांना मोठी मागणी राहणार असून, फुलांच्या दरात वाढ झाली आहे. पावसामुळे फुले भिजली आहेत. चांगल्या प्रतीच्या सुक्या फुलांना चांगला दर मिळत आहे. सोमवारी सकाळपासून हार, फूलविक्रेते, तसेच घरगुती ग्राहकांची मार्केट यार्डातील फूल बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती.

हेही वाचा >>> श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते होणार प्राणप्रतिष्ठापना

गौरी आगमनाच्या दिवशी फुलांच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे. विसर्जनापर्यंत फुलांचे दर तेजीतच राहणार असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील व्यापारी सागर भोसले यांनी दिली. मंडई, हुतात्मा बाबू गेनू चौक, शनिपार परिसरात पूजासाहित्य आणि फुलेखरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. फुले, केवडा, कमळ, पत्री, अत्तर, कापूस, विड्यांची पाने, फळे खरेदीसाठी गर्दी झाली होती. मंडई परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने या भागातील वाहतूक सोमवारी सकाळपासून विस्कळीत झाली होती.

हेही वाचा >>> पुणे: गणेशभक्तांनी खुशखबर! गणेशोत्सवाच्या काळात मेट्रोच्या वेळेत वाढ; जाणून घ्या नवीन वेळापत्रक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मार्केट यार्डातील घाऊक फूल बाजारात विविध फुलांचे दर पुढीलप्रमाणे- झेंडू- ३० ते ५५ रुपये, गुलछडी- ५०० ते ७०० रुपये, बिजली- ५० ते ८० रुपये, कापरी- ३० ते ७० रुपये, अष्टर (चार गड्डीचे दर)- २० ते २५ रुपये, ग्लॅडिएटर- ८० ते १०० रुपये, गुलछडी काडी- १०० ते १५० रुपये, डच गुलाब (२० नग)- १०० ते १८० रुपये, लिली बंडल (५० काडी)- ७० ते ८० रुपये, जरबेरा- २० ते ४० रुपये, कार्नेशन- १५० ते २०० रुपये, ऑर्किड- ३५० ते ५०० रुपये.