इंदापूर : यंदा मे महिन्यात ऐनवेळी आलेल्या पावसाने तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतशिवारात ओढे, नाले, विहिरी, तळ्याकाठच्या झाडांवर सुगरण पक्ष्याची घरटे बांधणीसाठी एकच धांदल उडाली आहे.

सर्वसाधारणपणे जून महिन्यामध्ये मोसमी पावसाच्या आगमनाची चाहूल लागताच सुगरण पक्षी पाण्याच्या दिशेने लोंबलेल्या फांद्यांवर सुरक्षित ठिकाणी घरटे बांधत असताे. मात्र या वर्षी वळिवाचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने सुगरण पक्ष्याने घरटे बांधण्यास लवकर सुरुवात केली आहे. अत्यंत सुबक आकाराची ही घरटी सर्वसाधारणपणे दीड ते अडीच फुटांपर्यंत उंचीची असतात. काही घरटी अत्यंत कौशल्याने तयार केलेली असतात. निमुळत्या फांदीला नखांच्या आणि चोचीच्या साह्याने गवताच्या भक्कम गाठी बांधून घरटे विणण्यात येते. सुगरण पक्ष्याचे हे कौशल्य पाहण्याजोगे असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नर सुगरण पक्षी हा प्रामुख्याने घरटे बांधतो. त्या घरट्याला सुबक आकार देत त्याचे काम सुरू असते. मादीला जे घरटे पसंत येईल त्या घरट्यामध्ये ती प्रवेश करते. राहिलेले काम पूर्णत्वास नेण्यास तीही नर पक्ष्याला मदत करते. ही मदत करत असताना तीदेखील कौशल्य वापरत असते. पिलांना उबदार गालिचा मिळावा यासाठी आजूबाजूला पडलेली मऊ पिसे, गवत, कापडाचा तुकडा असे साहित्य वापरण्यात येते. सध्या सुगरण पक्षी या कामात दंग आहे.- प्रा. कल्याण साळुंखे, पक्षिनिरीक्षक