पुणे: रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण करण्यासाठी असलेले इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनचे (आयआरसीटीसी) संकेतस्थळ मंगळवारी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले. हा बिघाड साडेदहा तासानंतर दूर करण्यात अखेर यश आले. या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी पुणे विभागात पुणे रेल्वे स्थानक आणि कोल्हापूर स्थानकावर प्रत्येकी एक अतिरिक्त आरक्षण खिडकी सुरू करण्यात आली.

आयआरसीटीसीचे संकेतस्थळ आणि उपयोजन (ॲप्लिकेशन) मंगळवारी पहाटे २ वाजून ५६ मिनिटांनी बंद पडले. तांत्रिक बिघाडामुळे हे घडले होते. यावर अखेर दुपारी १ वाजून २८ मिनिटांनी उपाययोजना करण्यात यश आले. त्यानंतर संकेतस्थळ आणि उपयोजन सुरू झाले. तिकीट आरक्षण यंत्रणा बंद असल्याने आयआरसीटीसीने ॲमेझॉन आणि मेकमायट्रीपसह इतर ठिकाणी तिकीट नोंदणीची सोय उपलब्ध करून दिली होती.

हेही वाचा… पुणे : सिंहगड रस्ता भागात दहशत माजविणाऱ्या गुंडांची पोलिसांनी काढली धिंड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ बंद असलेल्या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुणे विभागात पुणे स्थानकावर एक अतिरिक्त आरक्षण खिडकी सुरू करण्यात आली. त्यामुळे पुणे स्थानकावर आठ तिकीट आरक्षण खिडक्या सुरू होत्या. त्याचवेळी कोल्हापूर स्थानकावर एक अतिरिक्त खिडकी सुरू केल्याने तिथे दोन खिडक्या कार्यरत होत्या. पावसाळ्यामुळे प्रवाशांची गर्दी कमी असल्याने तुरळक संख्येने प्रवासी या खिडक्यांसमोर दिसून आले.

पावसाळ्यामुळे सध्या प्रवाशांची फारशी गर्दी नाही. त्यामुळे आयआरसीटीसीचे संकेतस्थळ बंद झाल्याचा फारसा फटका बसल्याचे दिसून आले नाही. पुणे स्थानक आणि कोल्हापूर स्थानकावर अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू करण्यात आल्या. – डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग