पुणे : मुंढव्यातील केशवनगर परिसरात एकाच कुटुंबातील चाैघांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर शनिवारी पोलिसांनी सदनिकेतून गुंतवणूक व्यवसायासंदर्भातील काही कागदपत्रे जप्त केली. प्राथमिक चाैकशीत शेअर बाजारात तोटा झाल्याने चौघांनी आत्महत्या केल्याची माहिती पाेलिसांना मिळाली आहे.
दीपक थोटे ( वय ५९), इंदू दीपक थोटे ( वय ४५), ऋषिकेश दीपक थोटे (वय २४), समीक्षा दीपक थोटे (वय १७, चौघे रा. केशवनगर, मुंढवा) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. थोटे कुटुंबीय मूळचे अमरावतीचे आहे. दोन महिन्यापूर्वी ते केशवनगर परिसरात वास्तव्यास आले होते. केशवनगर भागातील अंकुश काॅम्प्लेक्समध्ये त्यांनी सदनिका भाडेतत्वावर घेतली होती. ऋषीकेश आणि समीक्षा दोघे शिक्षण घेत होते. शुक्रवारी (१३ जानेवारी) सायंकाळी दरवाजा उघडला नाही. शेजारी राहाणारे डाॅक्टर दौलत पोटे यांना संशय आला. त्यांनी दरवाजा वाजविला. मात्र, थोटे कुटुंबीयांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर डाॅ. पोटे यांनी पुन्हा दरवाजा वाजविला. तेव्हा दरवाज्याची कडी सरकून दरवाजा उघडला. डाॅ. पोटे यांनी आत डोकावून पाहिले. तेव्हा शयनगृहात दीपक, त्यांची पत्नी इंदू, मुलगा ऋषीकेश, मुलगी समीक्षा बेशुद्धावस्थेत पडल्याचे आढळून आले. डाॅ. पोटे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजितकुमार लकडे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. शनिवारी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. थोटे कुटुंबीयांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली नव्हती. त्यामुळे, आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही.
मोबाइल तांत्रिक तपासणीसाठी
इंदू थोटे यांनी शुक्रवारी सायंकाळी स्वयंपाक केला होता. स्वयंपाकघरात दोन भाज्या आणि पोळ्या सापडल्या. पोलिसांनी जेवण न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहे. थोटे कुटुंबीयांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून चार मोबाइल संच जप्त केले आहेत. मोबाइलची तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे. तांत्रिक तपासातून पोलिसांना आत्महत्या प्रकरणात काही माहिती उपलब्ध होईल. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा – पुणे : स्पर्धा परीक्षार्थ्यांचे आंदोलन अठरा तासांनंतर स्थगित
पैसा प्राॅमिस नावाने गुंतवणूक व्यवसाय
ऋषिकेशने पैसा प्राॅमिस नावाने गुंतवणूक व्यवसाय सुरू केला होता. त्याने खराडी भागात कार्यालय घेतले होते. त्याने शेअर बाजारात गुंतवणूक केली हाेती. शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी त्याने गुंतवणुकदारांकडून पैसे घेतले होते. शेअर बाजारात झालेल्या आर्थिक नुकसानीतून चौघांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ऋषीकेशचे वडील दीपक खासगी ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. ऋषीकेशची बहीण समीक्षा एका वाणिज्य महाविद्यालयात शिक्षण घेत होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजितकुमार लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे तपास करत आहेत.