पुणे : राज्यातील करोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. गेल्या २४ तासांत राज्यात आणखी २६ रुग्ण आढळले असून, त्यातील सर्वाधिक २५ रुग्ण मुंबईतील आहेत. याच वेळी पुण्यातही एक रुग्ण आढळून आला आहे. या वर्षभरात करोनाचे एकूण १३२ रुग्ण आढळून आले असून, त्यांपैकी १२६ मुंबईतील आहेत.
राज्यात जानेवारी ते २१ मेपर्यंत करोनाच्या ६ हजार २०६ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात १३२ रुग्णांना करोनाचे निदान झाले. त्यात मुंबई महापालिका हद्दीत सर्वाधिक १२६ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील ४६ करोना रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात करोनासह श्वसनविकाराच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू आहे. अशा सर्वेक्षणामध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांची करोना चाचणी केली जात आहे. राज्यात करोनाचे रुग्ण सध्या तुरळक आढळून येत आहेत. त्यांच्यात सौम्य लक्षणे दिसून येत आहेत, अशी माहिती आरोग्य सहसंचालिका डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानेही करोनासह इतर साथरोगांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. याबाबत महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे म्हणाल्या, की परिमंडळ वैद्यकीय अधिकारी, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे साथरोग नियंत्रणाबाबत प्रशिक्षण घेण्यात आले आहे. महापालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये साथरोगांवरील औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात ५० रुग्णशय्यांचा कक्ष सुसज्ज ठेवण्यात आला आहे. याचबरोबर साथरोगांबाबत जनजागृती करण्याचे निर्देश क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. महापालिकेच्या स्तरावर साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
राज्यातील करोना संसर्ग (१ जानेवारी ते २१ मे)
करोना चाचण्या – ६ हजार २०६
एकूण रुग्ण – १३२
मुंबईतील रुग्ण – १२६
बरे झालेले रुग्ण – ४६
रुग्ण मृत्यू – २