पुणे : राज्यातील करोना रुग्णसंख्येत वाढ सुरू असून, गेल्या २४ तासांत आणखी ३३ रुग्ण आढळले असून, त्यातील सर्वाधिक २२ रुग्ण मुंबईत असून, पुण्यात ५ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये २ रुग्ण आहेत. या वर्षातील करोनाची एकूण रुग्णसंख्या १६५ वर गेली असून, त्यांपैकी १४८ मुंबईतील आहेत.
राज्यात जानेवारी ते २१ मेपर्यंत करोनाच्या ६ हजार ४७७ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात १६५ रुग्णांना करोनाचे निदान झाले. त्यात मुंबईत सर्वाधिक १४८ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील ६१ करोना रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात करोनासह श्वसनविकाराच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू आहे. अशा सर्वेक्षणामध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांची करोना चाचणी केली जात आहे. या रुग्णांवर तातडीने नियमित उपचार सुरू करण्यात येत आहेत. राज्यात या वर्षभरात दोन करोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, ते सहव्याधिग्रस्त होते, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
जनुकीय क्रमनिर्धारण सुरू
करोना रुग्णांची तुरळक वाढ महाराष्ट्रात दिसून येत असून, इतर राज्यांमध्येही करोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. करोना रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेला (एनआयव्ही) करोना विषाणू प्रकाराचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सहसंचालिका डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली.
श्वसनविकाराचे रुग्ण आढळल्यास त्यांची वेगळी नोंद महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ठेवण्यात येत आहे. याचबरोबर शहरातील खासगी रुग्णालयांनीही श्वसनविकाराच्या रुग्णांची नोंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. करोना रुग्ण आढळून आल्यास त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी केली जात आहे.- डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका
गेल्या २४ तासांतील करोना रुग्ण
मुंबई- २२
पुणे महापालिका – ५
पिंपरी-चिंचवड महापालिका – २
ठाणे महापालिका – ३
लातूर महापालिका – २
एकूण – ३३