पुणे : घरफोडी, चोरी, लूट अशा गंभीर गुन्ह्यात चोरीला गेलेला ऐवज पोलिसांनी चोरट्यांकडून परत मिळवला आहे. गंभीर गुन्ह्यांचा छडा लावून त्यांच्याकडून वेगवेगळ्या गुन्ह्यांत पाच कोटी ७५ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांतील तक्रारदारांना सोमवारी पाच कोटी ७५ लाख रुपयांचा ऐवज परत केला. चोरीला गेलेला ऐवज मिळल्याने तक्रारदारांच्या दृष्टीने ‘सोनियाचा दिन’ ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे पोलिसांकडून चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेला ऐवज सोमवारी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या मुद्देमाल हस्तांतरण सोहळ्यात सुपुर्द करण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तक्रारदारांना ऐवज सुपुर्द करण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा, रामनाथ पोकळे, प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त संदीपसिंग गिल, स्मार्तना पाटील, अमोल झेंडे, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख आदी उपस्थित होते.या कार्यक्रमात ५८ तक्रारदारांना ऐवज परत करण्यात आला.

हेही वाचा >>>पिंपरी-चिंचवडमध्ये नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक!

ज्या नागरिकांचा ऐवज चोरीला गेला होता. त्यांना पुणे पोलिसांकडून ऐवज परत करण्यात आला. मुद्देमाल, ऐवज परत करण्याचा उपक्रम अभिनव आहे. तक्रारदारांना कार्यक्रमात मुद्देमाल परत करण्यात येत असल्याने त्यांना आनंद होतो. अशा उपक्रमांमुळे समाजात चांगला संदेश जातो. पोलिसांविषयी विश्वासाची भावना निर्माण होते. चांगली कामगिरी करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळते, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले.

हेही वाचा >>>शिरूर लोकसभेवरून सुरू असलेला राष्ट्रवादीमधील वाद मिटला? विलास लांडे म्हणतात ” शरद पवार यांनी…. “

गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. तपास करताना पोलिसांना परिश्रम घ्यावे लागतात. चांगली कामगिरी करणारे पोलीस अधिकारी अभिनंदनास पात्र आहेत. गुन्हेगार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. पोलिसांना मर्यादित साधनांसह तपास करावा लागतो. पोलिसांना अद्ययावत सुविधा दिल्यास त्यांची कार्यक्षमता वाढेल. पोलीस वसाहतींची दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समिती आणि सामाजिक उतरदायित्व निधीच्या माध्यमातून १०० कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गुन्हे उघडकीस आल्यानंतर चोरट्यांकडून ऐवज, तसेच मुद्देमाल परत मिळवणे कठीण काम असते. त्यासाठी पोलिसांना परिश्रम घ्यावे लागतात. कायदेशीर बाबी पूर्ण करुन पोलिसांनी तक्रारदारांना पाच कोटी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल परत केला आहे, असे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The police recovered the stolen money from the thieves pune print news rbk 25 amy
First published on: 05-06-2023 at 15:13 IST