पुणे : बाणेर भागात रिक्षा चालकाने दिलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारासाठी घेऊन जातो, अशी बतावणी करून रिक्षाचालकाने रिक्षात बसवले. त्यानंतर खडकीतील रेंजहिल्स परिसरात रेल्वे रूळाजवळ त्यांना जखमी अवस्थेत सोडून रिक्षाचालक पसार झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने ज्येष्ठाचा मृत्यू झाला. याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रिक्षाचालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जुलै रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास ज्येष्ठ नागरिक हे काही कामानिमित्त बाहेर पडले. बाहेर पडताना त्यांनी पत्नीला सांगितले. त्यानंतर सायंकाळी सातपर्यंत ते घरी परतले नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी नातेवाईक, तसेच निकटवर्तीयांकडे चौकशी केली. वडील घरी न परतल्याने मुलगा तक्रार देण्यासाठी बाणेर पोलीस ठाण्यात गेला. तो पोलिसांबरोबर बालेवाडी फाटा परिसरात गेला. त्यांनी बालेवाडी फाटा चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले. तेव्हा सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास बाणेर परिसरातील बालेवाडी फाटा चौकातील न्यू पूना बेकरीसमोर रस्ता ओलांडणाऱ्या मुलाच्या वडिलांना रिक्षाचालकाने धडक दिल्याचे दिसून आले.

चित्रीकरणात वडील जखमी झाल्याचे आढळले. अपघातानंतर तेथे गर्दी झाली. नागरिकांकडून चोप बसेल, अशी भीती वाटल्याने रिक्षाचालकाने ज्येष्ठ नागरिकाला रिक्षातून रुग्णालयात घेऊन जातो, असे नागरिकांना सांगितले. गंभीर जखमी अवस्थेतील ज्येष्ठ नागरिकाला बालेवाडी फाटा परिसरातून रिक्षातून घेऊन विरुद्ध दिशेने बाणेरकडे रिक्षाचालक गेला. हा सारा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपला होता.

त्यानंतर २१ जुलै रोजी दुपारी चारच्या सुमारास खडकीतील रेंजहिल्स परिसरात रेल्वे रुळाजवळ गवतात ज्येष्ठ नागरिक जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दुपारी चारच्या सुमारास पोलिसांनीज्येष्ठ नागरिकाच्या मुलाशी संपर्क साधला. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे निष्पन्न झाले. मुलाने रिक्षाचालकाविरुद्ध फिर्याद दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गंभीर जखमी अवस्थेतील ज्येष्ठ नागरिकाला मदत न करता त्यांना जखमी अवस्थेत निर्जनस्थळी सोडून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या रिक्षाचालकाचा बाणेर पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.