लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: कंपनीतील कामगारांनी गुंडाला हाताशी धरून कंपनीतील कामगारांना एका लघुउद्योजकाकडे पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खंडणीसाठी लघुउद्योजकाला धमकाविणाऱ्या आरोपी कामगारांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली.
सौरभ बनसोडे (वय २१, रा. रामनगर, वारजे), पवन कांबळे (वय २२, रा. धायरी), संकेत जाधव (वय २४, रा. नऱ्हे) आणि कृष्णा भाबट (वय १९, रा. धायरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत एका लघुउद्योजकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदारांच्या कंपनीत बनसोडे, कांबळे आणि जाधव काम करतात. मालकाकडे किती रक्कम आहे, त्यांची येण्याजाण्याची वेळ तसेच त्यांचा रस्ता याबाबतची माहिती कामगारांना होती.
हेही वाचा… पिंपरी: श्वान पाळताय? परवाना घ्या, नाहीतर…
कात्रज परिसरात उद्योजकाची मोटार अडवून आरोपींच्या साथीदारांनी त्यांना धमकावली होते. त्यांना शस्त्राचा धाक दाखविला होता. त्यानंतर उद्योजकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. भारती विद्यापीठ पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता.
हेही वाचा… पुणे लोकसभेची पोटनिवडणूक कधी होणार?
पोलीस कर्मचारी हर्षल शिंदे, सचिन गाडे आणि धनाजी धोत्रे यांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून आरोपींना पकडण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धीरज गुप्ता आदींनी ही कारवाई केली.